News Flash

पाऊस आला, वीज गेली..!

शहर आणि परिसरामध्ये नेर्ऋत्य मोसमी पावसाला येत्या काही दिवसांतच सुरुवात होणार आहे.

पाऊस आला, वीज गेली..!
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

थोडय़ाच पावसात कमकुवत वीजयंत्रणेचे पितळ उघडे

पावसाचे काही थेंब कोसळण्यास सुरुवात झाली आणि पाऊस आला असे म्हणण्यापूर्वी वीज जात असल्याचा अनुभव शहर आणि परिसरातील अनेक नागरिकांनी घेतला आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘पाऊस आला, वीज गेली’ हे सूत्र कायम असल्याचे दिसून येत आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांतील कमकुवत वीजयंत्रणेचे पितळ थोडय़ाच पावसात उघड झाले आहे. या बरोबरीनेच हलगर्जीपणाने केलेल्या खोदकामामुळेही भूमिगत वीजवाहिन्या तुटून नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ येत आहे.

शहर आणि परिसरामध्ये नेर्ऋत्य मोसमी पावसाला येत्या काही दिवसांतच सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी शहर आणि परिसरामध्ये सध्या वळिवाच्या सरी बरसत आहेत. १ जूनला पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण विभागात वळिवाच्या मुसळधार सरी कोसळल्या. शहरात एकाच दिवसात २५ मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यानंतर आजवर दररोज दुपारनंतर कमीअधिक प्रमाणात वळिवाच्या सरी कोसळत आहेत. १ जूनला झालेल्या पहिल्याच चांगल्या पावसानंतर शहराच्या विविध भागांमध्ये विजेचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. काही ठिकाणी झाडाच्या फांद्या पडून वीजपुरवठा खंडित झाला. तर पालिकेच्या ठेकेदाराकडून चुकीच्या पद्धतीने आणि हलगर्जीपणाने केलेल्या खोदकामात वीजवाहिन्या तुटल्याने वीज गायब झाली. ही वीजयंत्रणेचा दोष नसलेली काही कारणे सोडली, तर बहुतांश वेळेला यंत्रणेत दोष निर्माण होऊन वीजपुरवठा खंडित झाला आहे.

पुणे शहराचा मध्यवर्ती भाग, हडपसर, स्वारगेट, कोथरूड, सिंहगड रस्ता, शिवाजीनगर आदी भागांत मागील पाच ते सहा दिवसांपासून विविध ठिकाणी वीज जाण्याचे प्रकार घडले आहेत. प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पावसामध्ये विजेबाबत नागरिकांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे. १ जूनच्या पावसापासून दररोजच कोणत्या ना कोणत्या ठिकाणी वीज गायब होण्याचे प्रकार होत आहेत. पाऊस येऊन उकाडा दूर होत असल्याचा आनंद असतानाच विजेअभावी अंधारात राहण्याची वेळ येत असल्याने या आनंदावर विरजण पडत असल्याचे चित्र आहे. शहर आणि परिसरातील बहुतांश भागात विजेची जुनाट यंत्रणा अद्यापही कार्यरत आहे. काही भागांत जुनेच ट्रान्सफॉर्मर आहेत. त्याचप्रमाणे उपकेंद्रातही काही ठिकाणी जुनी यंत्रणा आहे. विजेचा भार सहन न झाल्यास ही यंत्रणा मान टाकते. त्यामुळे संबंधित भागातील वीजपुरवठा खंडित होतो. ही जुनाट यंत्रणा बदलण्याची आवश्यकता आहे. महावितरणकडून पावसाळय़ापूर्वीची वीजयंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीची कामे केली जातात. मात्र, त्यानंतरही पावसात विजेचा खेळखंडोबा होत असेल, तर या कामांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

नागरिकांकडूनही पावसाळय़ात दक्षता हवी

  • पावसाळय़ात वादळवाऱ्यामुळे वीजतारांमध्ये घर्षण होऊन विजेचे खांब, विजेच्या तारा व रोहित्रे यातून ठिणग्या पडत असतात. अशा वेळी महावितरणच्या कार्यालयाला कळवावे. अशा ठिणग्यांतून वीजतारा तुटून, आग लागून दुर्घटनेची शक्यता असते.
  • विद्युत उपकरणांना पावसाचे पाणी लागणार नाही, या बाबत दक्षता घ्या. विशेषत: मीटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मीटरचे मुख्य स्वीच बंद करावे आणि तत्काळ महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधून मीटरची जागा बदलून घ्यावी.
  • विद्युत उपकरणे असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस आणि या विद्युत उपकरणांना हात लावू नये. ओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. त्यात निर्माण झालेल्या ओलाव्यामुळे शॉक लागण्याची शक्यता असते.
  • कपडे वाळत घालण्यासाठी लोखंडी तार वापरू नये तसेच ही तार विजेच्या खांबाला किंवा यंत्रणेला बांधू नये.
  • घरातील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ?ँटेना वीजतारांपासून दूर ठेवावा. ओल्या कपडय़ांवर विजेची इस्त्री फिरवू नये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2018 2:58 am

Web Title: rainfall electricity cut issue
Next Stories
1 आपत्ती व्यवस्थापनासाठी खास नियंत्रण कक्षाची स्थापना
2 प्रेरणा : आनंदाची फुलबाग फुलविण्याचा ध्यास..
3 पुण्यात हिंदू-मुस्लिम एकतेचं अनोखं चित्र, इफ्तारच्या नमाजआधी दर्ग्यात गायलं भजन
Just Now!
X