लांबलेला पाऊस, नवे सरकार स्थापनेतील अनिश्चिततेचा परिणाम

जिल्ह्य़ातील धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. दरवर्षीप्रमाणे ऑक्टोबरअखेर धरणातील पाण्याचे पुढील वर्षभराचे नियोजन आणि वाटप याबाबतचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होतो. मात्र यंदा लांबलेला पाऊस आणि नवे सरकार स्थापनेला होत असलेला विलंब या कारणांनी कालवा सल्लागार समितीची बैठक डिसेंबर महिन्यात होणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

धरणांतील पाण्याचे वर्षभराचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात येते. जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होते. मात्र, सध्या सरकार स्थापन करण्याबाबत अस्थिरता असल्याने आणि परतीच्या पावसानंतर सुरू झालेला अवकाळी पाऊस या पाश्र्वभूमीवर कालवा समितीची बैठक डिसेंबर महिन्यात घेणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. सद्य:स्थितीत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये २८.०१ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. त्यापैकी टेमघर धरणात २.७१ टीएमसी (७३.१९ टक्के), वरसगाव धरणात १२.८२ टीएमसी (१०० टक्के), पानशेत धरणात १०.६५ टीएमसी (१०० टक्के) आणि खडकवासला धरणात १.८३ टीएमसी (९२.६१ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी १२ नोव्हेंबरला चारही धरणात मिळून एकूण २२.९१ टीएमसी पाणीसाठा होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ५.१ टीएमसी पाणीसाठा अधिक आहे.

दरम्यान, पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात पाणी वाटपावरून गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला वाद टोकाला गेला आहे. महापालिकेची प्रतिवर्षी १७ टीएमसी पाण्याची मागणी असून त्यासाठी शहराची लोकसंख्या ५२ लाख झाल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्याआधारे पाणीकोटा वाढवून देण्याची मागणी महापालिकेने केली आहे. पाणीकोटा वाढवून देण्याबाबतचा निर्णय नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरच होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत धरणांमधील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक होणे आवश्यक आहे. मात्र, सध्यातरी ही बैठक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पाश्र्वभूमीवर पाणीवाटपाबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.

सल्लागार समितीच्या बैठकीत शहरासाठी आवश्यक पाण्याचे नियोजन

यंदा लांबलेल्या पावसामुळे धरणांमधील उपलब्ध पाण्याचे नियोजन अद्यापही करता आलेले नाही. गेल्या आठवडय़ापर्यंत शहरासह जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत होता. त्यामुळे कालवा सल्लागार समितीची बैठक डिसेंबरमध्ये घेण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. रब्बी आणि उन्हाळी आवर्तनासाठी धरणातून सोडण्यात येणारे पाणी तसेच पुणे शहरासाठी आवश्यक पाण्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केले जाईल, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली.