तापमान पुन्हा वाढले ’ येत्या आठवडय़ात पावसाची शक्यता

दिवसभर ढगाळ हवा आणि दुपारी प्रचंड ऊन अशा वातावरणात शुक्रवारी संध्याकाळी शहराच्या काही भागात पावसाचा हलका शिडकावा झाला. अगदी थोडा वेळ शिंतडून गेले असले तरी उकाडय़ापासून त्यामुळे दिलासा मिळालेला नाही. उलट गेल्या काही दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी तापमानात वाढच झाली.

आठवडय़ाच्या सुरूवातीला शहराचे तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या जवळ होते व त्यामुळे उकाडाही काहीसा सुसह्य़ झाला होता. मंगळवारनंतर कमाल तापमानात वाढ होऊन ते ३७ अंशांवर गेले. शुक्रवारी तापमानात आणखी एका अंशाची वाढ झाली. पुण्यात शुक्रवारी ३८.७ असे दिवसाचे तापमान राहिले, लोहगावला ते ३९.३ अंश होते. हवा मात्र गेल्या काही दिवसांसारखी ढगाळच असून वेधशाळेने वर्तवलेल्या पुढील सहा दिवसांच्या अंदाजानुसार सर्व दिवस हवा ढगाळ राहण्याचीच शक्यता दिसून येत आहे. ९ जूनपर्यंत दररोज शहरात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. सध्या वाढलेले तापमान मात्र या काळात दर दिवशी साधारणत: १ अंशाने कमी होऊन ३३ अंशांवर उतरु शकेल.