मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्ह्य़ातील भाज्यांची आवक घटल्यामुळे किरकोळ बाजारातील त्यांच्या दरात प्रतिकिलो १० ते ४० रुपये वाढ झाली आहे. भाज्यांच्या महागाईमुळे ग्राहकांच्या महिन्याच्या खर्चातही वाढ झाली आहे.

मुंबई-ठाण्याकडे होणारी भाज्यांची आवक ५० ते ६० टक्क्यांनी घटल्याने किरकोळ बाजारात भाज्यांचे दर कडाडले. दोन आठवडय़ांपूर्वी ५० रुपये किलो असलेल्या भेंडीचा दर सध्या ८० रुपयांवर गेला आहे, तर वांग्यानी ४० वरून ६० रुपयांवर झेप घेतली आहे. भरपूर क जीवनसत्व असलेला टोमॅटोच्या दरांमध्येही २० रुपयांनी वाढ झाली असून तो सध्या ८० रुपयांवर पोहोचला आहे. अन्य भाज्यांपेक्षा बाजारात अधिक भाव खाणारा फ्लॉवर १२० रुपयांवर पोहोचला आहे. त्याच्या दरात ४० रुपयांची वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी कोबी ४० रुपये होता आता त्याचा दर ६० रुपये आहे.

पावसामुळे भाज्यांच्या नुकसान झाले आहे. त्यामुळे वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक ३० टक्क्यांनीघटल्याचे वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी आर. के. राठोड यांनी सांगितले.

अन्य भाज्यांबरोबरच कांदा आणि बटाटा यांच्या दरांतही वाढ झाली आहे. सध्या वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा बटाटय़ाची आवक घटल्यामुळे किरकोळ बाजारात दरवाढ झाल्याची माहिती जांभळीनाका बाजारपेठेतील कांदा-बटाटा विक्रेते राजेश तांबटकर यांनी दिली.

गेल्या आठवडय़ात जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे भाज्यांच्या मळ्यांचे अतोनात नुकसान झाले. परिणामी मुंबई आणि ठाण्याकडे होणारी भाज्यांची आवक मंदावली आणि त्याची परिणती दरवाढीत झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

पुणे आणि नाशिक जिल्ह्य़ांत पिकणारा भाजीपाला मुंबई, ठाणे आणि लगतच्या उपनगरांची गरज पूर्ण करतो. मात्र, गेल्या आठवडय़ात भाजीपुरवठा करणाऱ्या पुणे-नाशिकला पावसाने झोडपल्यामुळे तेथील भाजी मळ्यांचे नुकसान झाले. त्याचा परिणाम पुरवठय़ावर झाला आणि मुंबई-ठाण्याकडे होणारी भाज्यांची आवक ५० ते ६० टक्क्यांनी घटली.

हिरवा वाटाणा तीनशेपार

हिरव्या वाटाण्याचा किलोचा भाव तिनशेवर पोहोचला आहे. आठवडय़ाभरापूर्वी घाऊक बाजारात १२० रुपये किलोने विकला जाणारा हिरवा वाटाणा सध्या १५० रुपये किलोने विकला जात आहे. तर, किरकोळ बाजारात हिरव्या वाटाण्याचा दर ३०० रुपये किलोवर पोहोचल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

भाज्यांचे दर (प्रति किलो)

भाज्या                घाऊक         किरकोळ

भेंडी                    ४०            ८०

गवार                   ५०             १२०

फरसबी               ७०            १२०

फ्लाँवर                 २८           १२०

कोबी                    १८             ६०

टोमॅटो                    ४०          ८०

वाटाणा                 १५०          ३००

वांगी                      २५            ६०

शिमला मिरची             ४०        ६०

पडवळ                   ४०          १००

पालेभाज्या (जुडीचे दर)

भाजी                  घाऊक        किरकोळ

मेथी                    २०              ३०

पालक                 १५              २०

शेपू                     २०             ३०

कोथिंबीर              ४५                ५०

तर आणखी महागाई

भाज्यांच्या दरांमध्ये अचानक वाढ झाल्याने आधीच करोना संकटात असलेल्या सर्वसामान्यांचा महिन्याचा जमाखर्च असमतोल झाला. भाजीपाल्याचा पुरवठा असाच रोडावलेला राहिला तर दर आणखी वाढतील, अशी भीती ठाण्यातील भाजीविक्रते सुरेश जाधव यांनी व्यक्त केली.

कांदा ६० रुपये 

* घाऊक बाजारात कांद्याचे दर २९ रुपयांवरून ४० रुपयांवर गेले आहेत.

* किरकोळ बाजारात कांद्याने ४० वरून ६० रुपयांवर झेप घेतली आहे.

* बटाटा घाऊक बाजारात बटाटा सध्या २९ रुपये किलोने विकला जात आहे.

* किरकोळ बाजारात बटाटा दरात १० रुपये वाढ होऊन तो ४० रुपयांवर पोहचला आहे.

कोथिंबीर जुडी ५० रुपये

पावसामुळे पालेभाज्या खराब होण्याचे प्रमाण जास्त असून कोथिंबिरीची आवकही कमी होत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने चांगल्या प्रतीच्या कोथिंबिरीचे दर कडाडले आहेत. किरकोळ बाजारात एक जुडी कोथिंबिरीची विक्री ४० ते ५० रुपये दराने केली जात आहे.

पुणे विभागातील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे तसेच सोलापूर परिसरात गेल्या पंधरवडय़ापासून पाऊस सुरू होता. त्यामुळे बाजारात विक्रीस पाठविण्यात येणारी कोथिंबीर खराब झाली. सततच्या पावसामुळे शेतात कोथिंबिरीच्या जुडय़ा सडल्या. त्यामुळे पुणे विभागातील कोथिंबिरीची आवक कमी झाली. अन्य पालेभाज्यांच्या तुलनेत कोथिंबिरीला गृहिणींकडून मागणी असते. गेल्या आठवडय़ापासून मार्केट यार्डातील तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी कर्नाटकातील शेतक ऱ्यांकडून कोथिंबीर मागविली. रविवारी तरकारी विभागात कोथिंबिरीच्या दीड लाख जुडींची आवक झाली. त्यापैकी सर्वाधिक कोथिंबीर कर्नाटकातील होती. घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीच्या दरात वीस रुपयांनी वाढ झाली, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते संघटनेचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.

पंधरा दिवसांनंतर नवीन कोथिंबिरीची आवक

सध्या बाजारात कर्नाटकातील कोथिंबिरीची आवक होत आहे. या कोथिंबिरीची पाने मोठी असतात. गावरान कोथिंबिरीची जुडी आकाराने लहान असते. पण चवीला चांगली असते. पुणे जिल्ह्य़ातील खेड, मंचर, हवेली तालुक्यातील मांजरी, लोणी काळभोर, उरळीकांचन, पुरंदर तालुका परिसरातून कोथिंबिरीची आवक होते. पावसामुळे कोथिंबिरीची आवक कमी होत आहे. कोथिंबीर खराबही झाली आहे. पावसाने विश्रांती घेतली आहे. नवीन कोथिंबिरीची आवक होण्यास साधारपणे पंधरा दिवस  लागतील. त्यानंतर दर कमी होतील, असे भाजीपाला विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.