दिवसाच्या तापमानात वाढीची शक्यता

पुणे : कमी दाबाचे पट्टे आणि हवेच्या चक्रीय स्थितीमुळे राज्याच्या सर्वच विभागांत आठवडाभर पावसाळी वातावरण कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. काही भागांत दुपारपर्यंत निरभ्र आकाश आणि त्यानंतर अंशत: किंवा सामान्यत: ढगाळ स्थिती राहणार असल्याने दिवसाच्या कमाल तापमानात या कालावधीत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

दक्षिणेपासून मध्य प्रदेशाच्या दरम्यान कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन त्याचप्रमाणे हवेच्या चक्रीय स्थितीचा परिणाम म्हणून गेल्या आठवड्यापासून राज्यात पावसाचे सावट आहे. काही भागांत पावसाच्या जोरदार सरींबरोबरच गारपीटही झाली आहे. राज्यातील पावसाळी वातावरण आणि मेघगर्जनेसह पावसाचे सावट आणखी आठवडाभर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोकण विभागात आणखी एक दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून, ९ मे पर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मात्र ९ मेपर्यंत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याचा वारा वाहून हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

प्रामुख्याने दुपारनंतर आकाश ढगाळ होण्याची शक्यता आहे. दुपारपर्यंत बहुतांश ठिकाणी निरभ्र आकाशाची स्थिती राहणार आहे. त्यामुळे पावसाळी स्थितीतही कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होणार आहे. सद्य:स्थितील कोकण विभाग वगळता इतरत्र बहुतांश भागातील कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमी आहे. रात्रीच्या अंशत: ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ होऊन रात्रीचा उकाडा काही प्रमाणात वाढला आहे.