सरकारकडूनच राज्यात टोलची लूटमार सुरु आहे. जोपर्यंत खोटे टोलनाके सरकार बंद करणार नाही तोपर्यंत टोलविरोधी आंदोलन सुरुच राहील, असे स्पष्ट करत या बुधवारी मनसे राज्यभर रास्तारोको आंदोलन करणार असून याचे नेतृत्व मीच करणार असल्याचे राज ठाकरे यांनी पुण्यात स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या जाहीर सभेत रविवारी ठणकावून सांगितले. हिम्मत असेल तर सरकारने मला अडवून दाखवावे आणि अटक करून दाखवावी, असे आव्हानही राज यांनी दिले.
मनसेच्या ‘टोल’फोड आंदोलनानंतर पुण्यात ९ फेब्रुवारीला सभा घेऊन टोलबाबत पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे राज यांनी सांगितले होते. त्यामुळे या सभेबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. टोलच्या मुद्दय़ावर राज ठाकरे म्हणाले की, टोलच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. टोलमध्ये गफला आहे, पण आघाडी सरकार असल्याने आपले हात बांधले गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयातही गेलो, पण तेथे ‘तारीख पे तारीख’ स्थिती झाली. मोडतोड नको म्हणून सर्व मार्गाने गेलो. माझा टोल या विषयाला विरोध नाही. राज्य चालविण्यासाठी पैसे लागतात, हे मला मान्य आहे, मात्र ज्या पद्धतीने टोलची वसुली केली जाते व त्या पैशांचे पुढे काय होते, याचे उत्तर मिळत नाही. हे पैसे मंत्र्यांचा घरात जात असतील, तर आम्ही टोल का भरायचा, असा सवाल त्यांनी केला. टोलसाठी ऐंशी किलोमीटर अंतर असावे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. पण, महाराष्ट्रात हे अंतर तीस किलोमीटरच्या खाली आहे. टोल माफ असलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींची व टोल न भरून पुढे गेलेल्या लोकांची संख्या जास्त दाखविली जाते व त्यातून टोलवसुलीची मुदत वाढवून घेण्याचे प्रकार होत आहेत, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला.
‘फक्त टोल भरा’!
हे पैसे कुणाच्या खिशात जातात, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांकडे नाही. टोल नाही, असा एकही रस्ता सोडलेला नाही. द्रुतगती मार्गावरील दोन स्वच्छतागृहे सोडली, तर राज्यात कोणत्याही रस्त्यावर स्वच्छतागृहे नाहीत, याकडे लक्ष वेधून रस्तेही खराब आहेत. नव्या रस्त्यात खड्डे आहेत, अशी टीका ठाकरे यांनी यावेळी केली.
इतके पैसे मोजूनही ही स्थिती आहे. पण, सरकारला त्याचे काहीही घेणे नाही, ते फक्त टोल भरा म्हणतात. टोलफोडीचे पैसे भरा म्हणून मला नोटीस आली. खोटय़ा टोलवरील पैसे लोकांना परत करा, त्यानंतर राज ठाकरे टोल भरेल. अन्यथा सतत फोडू व सतत जाळू, असा इशाराही त्यांनी दिला.
शिवसेनेला ‘रोखठोक’ सवाल
सरकारविरोधात माझे टोल आंदोलन सुरू असताना शिवसेना माझ्यावर टीका करत होती, असे सांगून हे विरोधी पक्षात आहेत की सरकारच्या बाजूने असा ‘रोखठोक’ सवाल करत राज यांनी शिवसेनेलाही झटका दिला.
‘चुन चुन के मारुंगा’
शरद पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनीच एसटी फोडू नका तर मंत्र्यांच्या गाडय़ा फोडा असे सांगितले आहे. आता काय करायचे बोला, असे सांगून उद्यापासून ‘चुन चुन के मारुंगा’ असेही राज म्हणाले. सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या मफलर बांधण्याची नक्कल करत त्यांचा मफलर मागून आवळून एकदाच काय ते बांधकाम करून टाकावे असे वाटत असल्याचे राज यांनी सांगताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

राज उक्ती..
* लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढवण्यासाठी मी आलेलो नाही, तर सरकारच्या डोक्यात तो नारळ फोडायला आलो आहे.
* राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेच म्हणतात की, एसटय़ा काय फोडता, मंत्र्यांच्या गाडय़ा फोडा. मग आम्ही काय करावे?
* पृथ्वीराज चव्हाण हे बिनपगडीचे मनमोहन सिंगच आहेत.
* अतिमहत्त्वाच्या गाडय़ांना टोलमाफी देतात आणि पुणे सातारा रस्त्यावरच्या टोलनाक्यावर मल्टिएक्सल अशा ट्रकसारख्या वाहनांनाही टोलमाफी दिली. राष्ट्रपती कधी अशा ट्रकमधून जातात का हो?
* मंत्र्यांच्या आणि पोलिसांच्या गाडय़ांचे दिवे दुकानात मिळतात. ते अतिरेक्यांच्या
हाती गेले तर? अशा दुकानांवर कारवाई का नाही करत? काळ्या काचा लावणाऱ्यांवर कारवाई करता मग त्या काचा विकणाऱ्यांवर कारवाई का नाही करत?