कोणतेही नियोजन नसताना शहरे वाढविली जात आहेत. त्यातून शहरे बकाल होत आहेत, मात्र त्याचे कुणालाही देणे-घेणे नाही. प्रस्थापितांच्या दुर्लक्षामुळे राज्याची ही अवस्था झाली आहे. एकदा माझ्या हातात सत्ता देऊन बघा, अनधिकृत बांधकामे करणाऱ्या बिल्डरांना खडी फोडायला पाठवितो, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. शहराचे नियोजन नसल्याने भविष्यात मोठा धोका आहे. त्यामुळे झपाटय़ाने वाढणाऱ्या शहरांतील इमारतींची बांधकामे पुढील दहा वर्षे थांबविली पाहिजेत, असेही ते म्हणाले.
मनसेचे पुण्यातील उमेदवार दीपक पायगुडे व शिरूरचे उमेदवार अशोक खांडेभराड यांच्या प्रचारार्थ राज यांनी रविवारी कोंढवा येथे सभा घेतली. त्यानंतर पायगुडे यांच्या प्रचारार्थ त्यांची दुसरी सभा येरवडा येथे झाली. या दोन्ही सभांमध्ये त्यांनी नियोजनाअभावी वाढणाऱ्या शहरातील प्रश्नांवर भाष्य केले. नियोजनाअभावी निर्माण झालेल्या प्रश्नांना प्रस्थापित मंडळी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. आजवर डोक्यावर बसलेल्यांना घरी बसवा, असे आवाहनही त्यांनी केले.
राज ठाकरे म्हणाले, की रस्ते नाहीत, पाणी नाही, वीज नाही, अशी स्थिती असताना मागचा-पुढचा कोणताही विचार न करता केवळ इमारती बांधल्या जात आहेत. कोणतेही नियोजन नसताना अशा प्रकारे शहरे उभी राहत असतील, तर पुढील पिढीसाठी ते धोकादायक आहे. त्यातून शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होतात. नगरसेवक, आमदार, खासदार यांची समिती काय नियोजन करते माहीत नाही. शहरात काही मोकळ्या जागा आहेत की नाही, तेही माहीत नाही. शहराचा कोणताही अराखडा आपल्याकडे नाही.
निवडून आल्यानंतर केवळ तुंबडय़ा भरायची कामे करायची असतील, तर मला निवडणुका लढवायच्या नाहीत, असे सांगून ते म्हणाले, की पायगुडे यांनी उभे केलेले काम पुण्याच्या खासदारांनी केले का, ते पाहावे. पुण्याचे प्रश्न ते योग्य पद्धतीने मांडू शकतील, त्यामुळेच त्यांना उमेदवारी दिली. नागरिकांची कामे होणार नसतील, तर पुन्हा मी त्या व्यक्तीच्या प्रचाराला जाणार नाही. लोकसभेत ताकद दाखवाच, पण येत्या विधानसभेत हे राज्य एकदा माझ्या ताब्यात देऊन बघा, काय घडवू शकतो याचा अंदाज तुम्हाला येईल.