महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या प्रभाग रचनेमध्ये भारतीय जनता पक्षाकडून हस्तक्षेप करण्यात आला आहे. अयोग्य पद्धतीने प्रभागांची रचना करण्यात आली आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे प्रभाग रचनेबाबतची तक्रार केली. मात्र सर्व तयारीनिशी निवडणुकीला सामोरे जाण्याचा आणि त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर बैठका घेण्याचा सल्ला राज ठाकरे यांनी दिला. प्रभाग रचना किंवा आरक्षणाच्या प्रक्रियेत त्रुटी असल्यास त्यावर मोठय़ा प्रमाणावर हरकती आणि सूचना नोंदवाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिका निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना आणि आरक्षणांची प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाली. महापालिकेच्या इतिहासात प्रथम चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार ही निवडणूक होणार आहे. मात्र ही प्रभाग रचना भारतीय जनता पक्षाला अनुकूल राहील, अशा पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेकडून करण्यात आला आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शहरातील पदाधिकारी आणि नगरसेवकांची नुकतीच मुंबईत बैठक घेतली. त्यावेळी मनसेच्या नगरसेवकांनी प्रभाग रचनेबाबतचा तक्रारींचा पाढाच त्यांच्यासमोर वाचला. प्रभागांची मोठय़ा प्रमाणावर मोडतोड करण्यात आली असून पक्षाच्या नगरसेवकांना फटका बसेल, अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आहे, असेही नगरसेवकांकडून त्यांना सांगण्यात आले. मात्र राज ठाकरे यांनी त्यांना निवडणुकीला सामोरे जाण्याची सूचना केली. त्यासाठी येत्या काळात सातत्याने बैठका, मेळावे घ्या, पूर्ण तयारीनी निवडणुकीला सामोरे जा, असे सांगतानाच प्रभागांच्या रचनेबाबत मोठय़ा प्रमाणावर हरकती-सूचना पक्षाकडून नोंदविण्यात याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही प्रभाग रचनांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये नवीन प्रभाग रचना आणि आरक्षणांची माहिती घेण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रभाग कसेही असू देत त्याचा विचार करू नका. पाच वर्षे आपण सत्तेत असून या कालावधीत करण्यात आलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवा, असे या बैठकीत बोलताना सांगितले.