शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी झालेल्या राज आणि उद्धव यांच्या भेटीबाबत तर्कवितर्क काढणाऱ्यांची राज यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत चांगलीच खिल्ली उडवली. मी तिथे गेलो तर गैर काय आणि तिथे गेलो तर तिथे उद्धवना भेटणारच ना. राजकीय चर्चा करायची तर ती आम्ही तिथे कशाला करू, अशी विचारणा करत त्या भेटीचा काहीही अर्थ काढू नका, असेही राज यांनी सांगितले.
मनसेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी राज पाच दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. उद्धव यांच्याशी झालेल्या भेटीबाबत त्यांना विचारले असता राज म्हणाले, की बाळासाहेबांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात मी गेलो नव्हतो. त्याला काही कारणे होती. त्या कारणांच्या खोलात जाऊ शकत नाही. मात्र स्मृतिदिनाचा कार्यक्रम सतत टाळण्याचे काही कारण नाही आणि मी तिथे गेलो तर त्यात गैर काय आहे? मी तिथे गेलो तर तिथे उद्धवला भेटणारच ना असा सवाल केला.
माझ्या मुलीचा अपघात झाला, तेव्हा तिला भेटण्यासाठी उद्धव आल्यानंतर त्या वेळीही आम्ही बराच वेळ चर्चा करत होतो. पण अशा ठिकाणी राजकीय चर्चा होऊ शकते का? अशी विचारणा करत त्या भेटीच्या फार खोलात जाऊ नका, मी फक्त त्या कार्यक्रमापुरता गेलो होतो. याचा अर्थ मनोमीलन होईल असा नाही, असेही राज यांनी सांगितले. दोन्ही पक्षांनी एकत्र यावे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, की कार्यकर्त्यांची एक भावना आहे आणि भावांची एक भावना आहे. चांगल्या भावनांची कदर लोक करताच. पण काही गोष्टी पटकन घडतात असे नाही.

बहुमत सिद्ध करायची ही पद्धत नाही
भाजपने विधानसभेत स्पष्टपणे मतदान घेऊन बहुमत सिद्ध करायला हवे होते. मात्र आवाजी मतदान ही काही बहुमत सिद्ध करायची पद्धत नाही. मतदान घेऊन ते सिद्ध केले असते, तर स्पष्टता आली असती. तिथे कोण विरोधात, कोणाचा पाठिंबा हे काहीच कळले नाही. त्यामुळे सध्या सत्ताधारी कोण आहे आणि विरोधक कोण आहे हेही कळलेले नाही, असेही राज म्हणाले.
शिवसेनेने निर्णय का घेतला नाही?
भाजप आणि शिवसेना यांच्यातील तणावाबाबत राज यांना विचारले असता ते म्हणाले, की भाजप हा त्यांचे राजकारण करणारच ना. ते ताणून धरणारच; पण जो काही निर्णय घ्यायचा तो शिवसेनेने घ्यायचा होता. तो त्यांनी का घेतला नाही? परिस्थिती ताणण्यापेक्षा सेनेने पटकन निर्णय घ्यायला हवा होता.