महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने टोलच्या विरोधात पुकारलेल्या रास्ता रोको आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर पुणे शहर, ग्रामीण आणि महामार्ग पोलीस सज्ज असून, जिल्ह्य़ात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहर आणि जिल्ह्य़ातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना कायद्याचे उल्लंघन न करण्यासाठी पाळण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी रात्री काही जणांना ताब्यात घेम्याची कारवाई सुरू केली होती. कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करायला घाबरू नका अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत, अशी माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त एम. बी. तांबडे यांनी दिली.
शहरात महत्त्वाचे चौक आणि एसटी बस, पीएमपी डेपो या ठिकाणी मंगळवारी रात्रीपासूनच बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात गस्त वाढविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. शहरातील गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्यांवर प्रतिबंधात्मक आणि ज्यांची पाश्र्वभूमी नाही अशा आंदोलन करणाऱ्यांना १४९ ची नोटीस बजावण्यात येणार आहे. शहरात बाहेरून बंदोबस्त मागविण्यात आला आहे. त्यामध्ये एक शीघ्र कृती दलाची आणि राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, तीनशे होमगार्ड मागविण्यात आले आहेत. गस्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे चाळीस मोटारींची मागणी केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपायुक्त यांच्यासोबत एक कार्यकारी दंडाधिकारी देण्याची मागणी केली आहे. प्रत्येक परिमंडळाच्या पोलीस उपायुक्तांच्या मदतीसाठी एक पोलीस उपायुक्त देण्यात आला आहे. द्रुतगती आणि महामार्गावर अडथळे निर्माण केले जाण्याची शक्यता असल्यामुळे हे अडथळे दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. अग्निशामक दल, शासकीय रुग्णालय यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे तांबडे यांनी सांगितले.
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे म्हणाले, की रास्ता रोको होणाऱ्या ठिकाणांची माहिती काढण्यात येत असून त्या ठिकाणाहून वाहतूक कशी वळविता येईल याची योजना तयार करण्यात आली आहे. यासाठी पुणे ग्रामीण आणि महामार्ग पोलिसांबरोबर चर्चा करण्यात येत आहे. कात्रज, कोंढवा, दत्तवाडी, हिंजवडी, या ठिकाणी जेसीबी आणि क्रेन तैनात ठेवण्यात येणार आहे.
पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी म्हणाले की, पुणे जिल्ह्य़ातील महामार्गावर आंदोलन होणाऱ्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्य़ातील मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटिसा देऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. महामार्ग पोलिसांच्या मदतीने सर्व रस्त्यांवर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
महामार्ग विभागाचे पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ म्हणाले की, महामार्गावर आंदोलन होणारी संभाव्य ठिकाणे आणि टोलनाके या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाल्यास पर्यायी मार्गावर वाहतूक कशी वळविता येईल याचा आराखडा तयार करून सर्वाना माहिती देण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्थेसाठी स्थानिक पोलिसांची मदत घेतली जाईल.
वाहतुकीसंबंधी माहिती रेडिओवरून देणार- विश्वास पांढरे
एखाद्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी अडथळे निर्माण करून वाहतूक बंद केली तर त्या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्या रस्त्यावर वाहतूक बंद झाली आहे, पर्यायी मार्ग कोणते याची माहिती वाहतूक शाखेकडून,शहरातील सर्व एफएम रेडिओ वाहिन्यांवरून  दिली जाईल. नागरिकांनी कोणते मार्ग टाळावे, कोणत्या मार्गाचा वापर करावा हे सुध्दा सांगण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी दिली.