शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शाई फेकण्याच्या घटनेबाबत तीव्र शब्दांत हल्ला चढवित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी व महायुतीलाही लक्ष्य केले. जातीपातीची ही पिलावळ आजवर महाराष्ट्रात काँग्रेस- राष्ट्रवादीने पोसली व अशा लोकांना पाठिंबा देणाऱ्या विनायक मेटेंसारख्यांना शिवसेना व इतर पक्षांनी महायुतीत घेतले. एकमेकांवर जातीचे शिक्के मारून राजकारण केले जात असून, त्यातून आपण आपल्याच महापुरुषांची विटंबना करतो आहोत, असे वक्तव्य राज यांनी सोमवारी केले.
मनसेचे पुण्यातील उमेदवार दीपक पायगुडे यांच्या प्रचारार्थ राज यांची कोथरूड येथे सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. राज ठाकरे म्हणाले की, आपले खासदार दिल्लीत जाऊन कोणत्याही प्रश्नावर भांडत नाहीत. निवडणुका आल्या की, जात बाहेर काढून मते मागितली जातात. बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार झाला. एखादी गोष्ट पटत नसेल, तर त्यांच्याशी बोला ते समजावून सांगतील. बाबासाहेबांचे शिवचरित्र ब्राह्मणी आहे, असे म्हणणाऱ्यांनी ते कधी वाचले आहे का? प्रत्येक इतिहास आता जातीतून पाहायचा का?
जातीपातीच्या राजकारणात आपण महापुरुषांची नावे खराब करीत असल्याचे सांगून ते म्हणाले की, कोण जेम्स लेन येऊन गेला त्यावरून आपण भांडतो. ज्याला इतिहास माहीत नाही, त्यावर आपण बोलतो. जातीचे शिक्के मारून महापुरुष वाटून घेतले, पण प्रत्येक महापुरुषावर महाराष्ट्राचा अधिकार आहे. काहींच्या मनात जातीचे विष असते, वेळ आल्यावर ते बाहेर काढले जाते. आरक्षणाचा विषयही असाच आहे. पण, गरीब असेल त्यालाच आरक्षण द्यावे, जातीच्या निकषावर आरक्षण नको.
‘राजनाथ सिंहांना नव्हे, मोदींना पाठिंबा’
राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केल्याच्या मुद्दय़ावर भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर राज म्हणाले की, महायुतीला पाठिंबा द्या किंवा विलीन व्हा, असे राजनाथ सिंह म्हणाले. तसे करायला माझा पक्ष उत्तर प्रदेशातील वाटला का? मी मोदींना पाठिंबा दिला आहे, राजनाथ सिंहांना नाही. त्यावर मोदी काही बोलत नाही, मग तुम्ही काय बोलता? बहुतांश पंतप्रधान उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगून ते म्हणाले की, पंतप्रधान झाल्यावर मोदींना विनंती करणार की पहिला तेथील विकास करा, म्हणजे महाराष्ट्रात येणारे लोंढे तरी थांबतील.