नागरिकांचे हित आणि शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी, विकासाच्या कामांसाठी तुम्ही इतर पक्षांना मदत केलीत तर चालेल; पण नको त्या बाबतीत इतर पक्षांबरोबर सलगी कराल, तर याद राखा, अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी स्वपक्षीय नगरसेवकांना झापले. महापालिका निवडणुकीतील यशामुळे पक्षातील गटबाजी वाढली आहे. तुमची ही गटबाजी मी खपवून घेणार नाही, असेही त्यांनी या वेळी सुनावले.
राज तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून शुक्रवारी त्यांनी राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या बैठकीनंतर शनिवारी पुण्यातील नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली होती. विधी महाविद्यालयाजवळ असलेल्या राज यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. बैठकीत नगरसेवकांच्या कामाबाबत झाडाझडती झाली. सर्वाच्या कामगिरीचा आढावा राज यांनी या वेळी घेतला. यापूर्वी पुण्यात चांगले काम झाले होते. तेव्हा आपले आठ नगरेसवक होते. त्यांनी चांगले काम केल्यामुळे आपली संख्या आता अठ्ठावीस झाली आहे. लोकांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या प्रभागात चांगली विकासकामे झालीच पाहिजेत. या कामांमध्ये इतर पक्षांना मदत केलीत वा मदत घेतलीत तर चालेल; पण नको त्या बाबतीत इतर पक्षांबरोबर सलगी केलेली चालणार नाही. तसा प्रकार केलात तर याद राखा, अशा शब्दांत राज यांनी सर्वाना समज दिली.
तुमच्या गटबाजीबद्दल मी वारंवार इशारे देत आहे; पण गटबाजी वाढत असल्याचे माझ्या लक्षात येत आहे. अशा प्रकारांमुळे शहरात आपली प्रतिमा मलिन होते. तुमची गटबाजी खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी सुनावले.
प्रभागातील कामे चांगल्या पद्धतीने आणि दर्जेदार झाली पाहिजेत. तुम्ही अशी कामे केलीत, तर मी नक्कीच उद्घाटनाला येईन. अशा कामांमध्ये नागरिकांचा सहभाग असला पाहिजे. या कामांचे उद्घाटन देखील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करा, असे राज यांनी सांगितले.