News Flash

पिंपरी-चिंचवड येथील भाजपाच्या महापौरांचे राज ठाकरेंसमोर लोटांगण

एका खासगी जिमच्या उद्घाटनासाठी आलेल्या राज ठाकरे यांच्यासमोर जाधव यांनी थेट लोटांगणच घातले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भाजपाच्या दुसऱ्या महापौरपदाचा बहुमान मिळालेल्या राहुल जाधव यांनी शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर लोटांगण घालत त्यांचा आशीर्वाद घेतला.

रिक्षा चालक ते पिंपरी-चिंचवडचे महापौर अशी भाजपाचे राहुल जाधव यांची ओळख आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून राजकारणाला सुरूवात करणाऱ्या जाधव यांनी भाजपामध्ये प्रवेश करत थेट महापौरपदही मिळवले. भाजपात असूनही त्यांचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावरील प्रेम अजूनही कमी झाले नसल्याचे त्यांच्या कृतीवरून दिसून आले. एका खासगी जिमच्या उद्घाटनासाठी आलेल्या राज ठाकरे यांच्यासमोर जाधव यांनी थेट लोटांगणच घातले. जाधव यांच्या या कृतीमुळे मात्र राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगल्याचे दिसून येते.

राज ठाकरे यांनी मनसेची स्थापन केल्यानंतर जाधव यांनी मनसेत प्रवेश करत राजकारणातील श्रीगणेशा केला. त्यांनी पक्षाचा विस्तारासाठी कठोर परिश्रम घेतले. याचे फळ म्हणून २०१२ च्या महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे यांनी जाधव यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली. जाधव यांनी हा विश्वास सार्थ ठरवला. ते बहुमताने विजयी आले. त्यानंतर त्यांनी वर्ष २०१७ मध्ये आमदार महेश लांडगे यांच्यासोबत भाजपात प्रवेश केला. भाजपामधून नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर जाधव यांना महेश लांडगे यांचे समर्थक म्हणून ओळखले जाऊ लागले.

पक्षानेही त्यांना महापौरपदाची संधी दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भाजपाचे दुसरे महापौर होण्याचा त्यांना बहुमान मिळाला. पण राज ठाकरे हे पिंपळे-गुरव येथे आल्याचे समजताच जाधव यांनी तेथे धाव घेतली आणि पक्षभेद विसरत राज यांचे आशीर्वाद घेत त्यांच्यासमोर लोटांगणच घातले. भाजपात असलो तरी राज ठाकरे यांच्यावरील आपले प्रेम कमी झाले नसल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 9:44 pm

Web Title: raj thackeray pimpri chinchwad municipal corporation bjp mayor rahul jadhav
Next Stories
1 प्रेरणा: क्षितिज विस्तारताना…
2 पिंपरी-चिंचवड मध्ये संगणक अभियंत्यांची गळफास घेऊन आत्महत्या
3 ‘नोकरभरतीत परप्रांतीयांना स्थान मिळाल्याने कंपन्यांची तोडफोड’
Just Now!
X