टोलच्या विरोधात कार्यकर्त्यांना तोडफोड करण्याचे आदेश देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात आपल्या भाषणातून काय धुमाकूळ घालणार, याकडे आता लक्ष लागले आहे. राज ठाकरे थोड्याच वेळात स. प. महाविद्यालयाच्या मैदानावरील जाहीर सभेत आपले विचार मांडणार असून, त्यातून टोलसह राज्यातील विविध प्रश्नांवर मनसेची भूमिका मांडणार आहेत.
या सभेच्या ठिकाणावरून गेल्या आठवड्यापासून सुरू असलेला घोळ अखेर शनिवारी मिटला. स. प. महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने राज ठाकरेंच्या सभेसाठी मैदान उपलब्ध करून देण्यास शनिवारी संमती दिली. त्याआधी शुक्रवारी सभा डेक्कनजवळ नदीपात्रात घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. सभेसाठी ठिकाण मिळण्यावरून झालेल्या गोंधळावर राज ठाकरे आपल्या ठाकरी भाषेत काय बोलताहेत, याकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
राज ठाकरेंच्या सभेसाठी व्यासपीठ उभारण्याचे आणि ध्वनीक्षेपक यंत्रणा तयार करण्याचे काम पक्षाच्या राज्यातील नेत्यांच्या नेतृत्त्वाखाली रविवारी दुपारपर्यंत सुरू होते. दुपारपासूनच राज्याच्या विविध भागांतून कार्यकर्ते पुण्यातील सभास्थानी पोहोचले असून स. प. महाविद्यालचा संपूर्ण परिसर मनसे कार्यकर्त्यांच्या गर्दीने भरून गेला आहे. सभेच्या ठिकाणी पोलीसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.