शरद पवार यांची स्पष्टोक्ती; देश चालवणे म्हणजे राज्य चालवणे नव्हे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नरेंद्र मोदी हे अत्यंत मेहनती गृहस्थ आहेत. त्यांनी गुजरातचे नेतृत्व समर्थपणे केले असेल. पण राज्य चालवणे आणि देश चालवणे या वेगवेगळ्या बाबी आहेत. देश चालवण्यासाठी वेगळी टीम लागते. तशी टीम मोदींकडे नाही हे वास्तव आहे, अशी स्पष्टोक्ती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या जाहीर मुलाखतीत पवार यांनी हे मत मांडले. काँग्रेस पक्ष सध्या अनेक राज्यांमध्ये कमकुवत झालेला असला, तरी तो खऱ्या अर्थाने राष्ट्रव्यापी पक्ष आहे. देशात सध्या भाजपला तोच पर्याय ठरू शकतो. एका पक्षाला आव्हान देणारा दुसरा देशव्यापी पक्ष असणे नेहमीच आवश्यक असते,  असेही पवार यांनी सांगितले.

जागतिक मराठी अकादमीने बुधवारी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या दोन पिढय़ांच्या प्रतिनिधींमधील मुलाखतीचा आगळावेगळा सोहळा अनुभवण्यासाठी पुण्याच्या बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात पुणेकरांनी प्रचंड गर्दी केली होती.

राजकारणात खरे बोलावेच लागते, पण अडचणीचे असेल तर न बोलणेच चांगले असते. शेवटी समाजमन किंवा व्यक्तीचे मन दुखवायचे नसेल तर कुठे थांबायचे हे शिकले पाहिजे, असे सांगून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीच्या यशाचे रहस्य राज ठाकरे यांच्या पहिल्याच प्रश्नावरील उत्तरात स्पष्ट केले, आणि पुढे प्रत्येक प्रश्नात राज-पवार या दोन पिढय़ांच्या प्रतिनिधींमधील हा सामना उत्तरोत्तर रंगतच गेला. शिवाजी महाराज हाच महाराष्ट्रातील जातिभेद गाडून एकत्र ठेवणारा आदर्श असून, फुले-शाहू-आंबेडकरांचे विचारच राज्याला एकसंध ठेवतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. आज राज्यात जाती-आधारित संघटना सक्रिय झाल्या असून त्याला सत्तेवरील काही घटकांचे प्रोत्साहन मिळत आहे. त्यातूनच आपले राजकारण यशस्वी होईल ही भावना वाढीस लागली आहे. मात्र, महाराष्ट्र या विचारांनी नव्हे तर शाहू-फुले-आंबेडकरांच्या मार्गानेच पुढे जाईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

मुलाखतीच्या सुरुवातीचा पहिला चेंडू टाकण्याआधी राज ठाकरे यांनी आपल्या सरावाची चुणूक दाखवून मुलाखतीचे रंग श्रोत्यांसमोर उलगडले. या मुलाखतीचा योग कसा जुळला याची पाश्र्वभूमी सांगत ते म्हणाले, ‘काल मी पुण्यात आल्यावर सहज चौकशी केली. पवार कुठे राहतात मला माहीत नव्हते. मी चौकशी केल्यावर कळले की ते ‘मोदीबाग’ नावाच्या परिसरात राहतात!.. मी त्यांना काल भेटलो, पण प्रश्न त्यांना सांगितले नाहीत. कारण प्रश्नांमधील उत्स्फूर्तपणा मला संपवायचा नव्हता. मी त्यांना जे प्रश्न विचारणार आहे, ते महाराष्ट्राला, देशाला पडणारे प्रश्न आहेत. माझ्या, आपल्या मनातले प्रश्न मी विचारणार आहे. काही प्रश्नांची उत्तरे जर पवारांकडून मिळणार नसतील, तर कुणाकडून मिळणार.. म्हणून ते मोकळेपणाने बोलतील अशी माझी अपेक्षा आहे,’ असे राज ठाकरे सुरुवातीलाच म्हणाले, आणि ही मुलाखत रंगणार या अपेक्षेने जमलेला श्रोतृसमुदाय सुखावला. पुढे प्रत्येक संवाद रंगतच गेला..

यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी म्हणाले होते, की महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहेत, यावर तुमचे मत काय असा थेट प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. त्यावर पवार म्हणाले, यशवंतरावांची तरुणांशी सुसंवाद साधण्याची एक वैशिष्टय़पूर्ण लकब होती. पुण्यात एकदा ते आले असताना आम्ही त्यांना त्यांच्या या वक्तव्याविषयी विचारले, ‘राष्ट्र एकसंध ठेवण्यातील नेहरूंचे योगदान प्रचंड मोठे आहे, आणि मी नेहमी राष्ट्राचा विचार करतो, म्हणून मी असे बोललो’, असा खुलासा यशवंतरावांनी केला. महाराष्ट्राने नेहमी देशाचा विचार केला. जात, धर्म, भाषा यांपेक्षाही राष्ट्र महत्त्वाचे आहे, हे सूत्र गोपाळ कृष्ण गोखले यांनी राज्याला दिले होते. तो विचार प्रत्येक मराठी माणसाने केला पाहिजे. महाराष्ट्रासाठी आपण हवे ते योगदान देऊ, पण त्याआधी देशाचा विचार प्रत्येकानेच केला पाहिजे,’ असे पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या सलोख्याचेही काही पदर पवार यांनी या मुलाखतीत हळुवारपणे उलगडून दाखविले. बाळासाहेब, जॉर्ज फर्नाडिस आणि माझे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. मुंबईचे गिरणगाव बंद पडले तर मराठी माणूस देशोधडीस लागेल व गिरणीमालक टोलेजंग इमारती बांधतील व लोकसंख्येची स्थिती भयावह होईल म्हणून गिरण्या जगवल्या पाहिजेत, अशी भूमिका घेऊन आम्ही तिघांनी शिवाजी पार्कला सभा घेतली. म्हणून दत्ता सामंतांच्या संपाला विरोध केला. पण आज मुंबईची स्थिती आपण पाहत आहोत, असे एका प्रश्नावरील उत्तरात पवार म्हणाले.

ज्यायोगे महाराष्ट्राची जनता एकत्र राहील तो घटक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे, असे पवार म्हणाले. महाराष्ट्र शिवरायांचा आहे याबद्दल कुणाच्याच मनात शंका नाही. शाहू-फुले-आंबेडकरांनी महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी अपार कष्ट घेतले. म्हणून मी माझ्या भाषणांत शाहू-फुले-आंबेडकरांचा उल्लेख करतो. या तिघांनी जातपातधर्म न मानता यासाठी परिश्रम घेतले. अजूनही आपल्याला या तिघांच्या विचारांचे स्मरण करण्याची गरज आहे. तो विसर पडला तर राज्य दुबळे होईल. काहीही झाले तरी महाराष्ट्र दुबळे होऊन चालणार नाही, असे पवार म्हणाले. महाराजांच्या भूमीत जातीजातींमध्ये आलेला कडवटपणा दूर करण्यासाठी फुले-आंबेडकर-शाहू महाराजांचा विचारच तारून नेईल, असा दावाही त्यांनी केला.

मुलाखतीचे दडपण होते

पवारांची मुलाखत घ्यायची म्हटल्यावर फुटाणेंना मी पहिला प्रश्न विचारला, की तुम्ही त्यांना विचारलेय का, ते हो म्हणाले. महाराष्ट्राला पडलेले प्रश्न मी पवार यांना विचारेन व पवार त्यास दिलखुलास उत्तरे देतील अशी ग्वाही फुटाणेंनी दिल्यावर मी ही मुलाखत घ्यायला तयार झालो, पण आता मला टेन्शन आलंय. मी राजकीय पक्षाचा नेता म्हणून नव्हे, तर बाळासाहेबांच्या पिढीचा देशाला माहीत असलेला शेवटचा नेता माझ्यासमोर आहे याची मला जाणीव आहे. आज ही मुलाखत घेत असताना माझ्यावर असलेलं दडपण हे एका पिढीच्या अंतराचं दडपण आहे.

‘माझी करंगळी मोदींना कधीही सापडली नाही’

महाराष्ट्र देशाचा विचार करत आला, पण बाकीची राज्ये देशाआधी आपल्या राज्यांचा विचार करतात, यामुळे महाराष्ट्राचे नुकसान होते असे मत एका प्रश्नात राज ठाकरे यांनी व्यक्त केले. त्यावर पवार म्हणाले, की महाराष्ट्राला आपल्या या विचाराची किंमत काही प्रमाणात मोजावी लागली हे खरे आहे. देशाचे नेतृत्व करायचे असेल, तर मोदींनी गुजरातचा अभिमान नक्कीच ठेवावा, पण तुम्ही देशाचे नेते आहात, हे विसरू नका, असा टोला पवार यांनी मोदींचा नामोल्लेख न करता मारला. पण तुमचा हा सल्ला तुमचा शिष्य ऐकतो का, असा थेट सवाल राज ठाकरे यांनी करताच, पवार खुलले. काही गोष्टी मी आता स्पष्टच सांगतो, असे सांगून त्यांनी मोदींसोबतच्या आपल्या राजकीय नात्याची खुमासदार उकल करण्यास सुरुवात केली. मोदींकडे पाहण्याचा काँग्रेसचा दृष्टिकोन फारसा अनकूल नव्हता. पण मोदी दिल्लीत आले की माझ्या घरी येत. माझ्या करंगळीला धरून काम केले असे मोदी म्हणाले, पण माझी करंगळी कधीच त्यांच्या हातात सापडली नाही, असे पवार यांनी सांगताच, उपस्थितांत खसखस पिकली. मात्र, मोदींसोबत माझा व्यक्तिगत सलोखा आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

वेचक-वेधक

  • महाराष्ट्राने नेहमीच देशाचा विचार केला
  • जातिभेदाला सत्तेतील घटकांची फूस
  • शिवरायांची प्रेरणा, फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार राज्याला पुढे नेतील
  • बाळासाहेब ठाकरेंशी नेहमीच स्नेह राहिला
  • ‘बुलेट ट्रेन’मुळे मुंबईतील गर्दीच वाढेल

 

पाहा ही मुलाखत

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray to interview sharad pawar
First published on: 22-02-2018 at 02:07 IST