समाजावर संस्कार करण्याचे काम साहित्यिकांनी करायला हवे. मात्र, हल्ली संमेलनाध्यक्ष पदावरून जो काही वाद होतो, त्याचा वीट येऊ लागलाय. खरंतर दरवर्षी ज्या लेखकाची सर्वाधिक पुस्तके विकली जातात, त्याला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष करावे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी पुण्यात मांडले.
‘ऐशी अक्षरे’ मासिकाचा दशकपूर्ती सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते म्हणाले, साहित्य संमेलनाबद्दल माध्यमांमधून जे काही दाखवलं जातं, छापून येतं त्यावरून त्याचा वीट येऊ लागलाय. एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढण्याचे काम साहित्यिक करणार असतील, तर तरुणांवर संस्कार करायचे कोणी? प्रत्येकवेळा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून वाद निर्माण होतो. यंदाच पहिल्यांदा असा वाद झालेला दिसला नाही. मला वाटतं ज्याची सर्वांत जास्त पुस्तकं विकली जातात, त्याला संमेलनाचे अध्यक्ष करावे.
जगातील प्रत्येक देश त्यांच्या भाषेबद्दल जागृत असतो. मात्र, आपल्याकडेच या विषयावर अजून संदेश द्यावे लागतात. मराठीबद्दल आपल्याला अभिमान आहे. मात्र, तो कडवट हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.