मोदींचे नाव पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून चर्चेतही नसताना २०१० साली मी ते पंतप्रधान व्हायला पाहिजे, असे बोललो होतो. आता लोकसभा निवडणुकीत मला त्यांचा मुखवटा घेऊन फिरण्याची गरज नाही. असे स्पष्ट करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पुन्हा एकदा आपले खासदार मोदींनाच पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देतील, असे स्पष्ट केले. आपल्या भाषणात त्यांनी शिवसेनेवर तीव्र शब्दांत टीका केली. शिवसेना ‘सामना’ मधून माझी औकात काढते. माझी औकात काय आहे, हे या निवडणुकीत दाखवून देईन, असाही इशारा राज ठाकरे यांनी दिला.
पुण्यातील नदीपात्रामध्ये मनसेच्या राज्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. मनसेने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ पुण्यातील सभेने वाढविला. यापुढे २१ एप्रिलपर्यंत राज्यात विविध ठिकाणी राज ठाकरे यांच्या सभा होणार आहेत.
आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणात राज ठाकरे यांनी शिवसेना, कॉंग्रेस, राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. 
राज ठाकरे म्हणाले, जर उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याची चर्चा माझ्याशी करायची होती, तर फोन उचलून माझ्याशी बोलायचे होते. मात्र, त्यांना एकत्र यायचंच नव्हतं. फक्त तुम्हाला दाखवायचं होतं की आम्ही टाळीला तयार आहोत. त्यानंतर पुण्यात गोपीनाथ मुंडे यांनी माझी भेट घेतली. नितीन गडकरीही भेटले आणि निवडणूक एकत्रित लढवायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावेळी माझा प्रश्न एवढाच होता की कसं ते सांगा. मात्र, त्या दोघांकडे त्याचे उत्तर नव्हते. काही दिवसांपूर्वी निवडणूक न लढविण्याचा प्रस्ताव गडकरींनी ठेवला होता. मात्र, त्याला मी साफपणे विरोध केला. माझा पक्ष आहे, राज्यातील जनता माझ्या पाठिशी आहे, अशावेळी निवडणूक लढवायची नाही, असे कसे होईल, असा प्रश्न मी त्यांना विचारला. या सगळ्या घडामोडी घडत असतानाचा शिवसेनेने ‘सामना’मधून माझ्यावर टीका करायला सुरुवात केली. माझी औकात काय, असा प्रश्न विचारण्यात आला. आता माझी औकात काय आहे, हे या निवडणुकीत दाखवून देईन, असे राज ठाकरे म्हणाले.