राज ठाकरे यांच्या रविवारच्या सभेसाठी स.प. महाविद्यालयाचे मैदान देण्याबाबत गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्यासह सरकारमधील काही मंत्री तसेच, पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्याकडून आलेला दबाव आणि सभेला मैदान दिले नाही तर मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड होण्याची धास्ती या कारणांमुळे शिक्षण प्रसारक मंडळीने अखेर राज ठाकरे यांच्या रविवारी होणाऱ्या सभेला हे मैदान देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या सभेच्या ठिकाणाचा घोळ अखेर संपला.
ठाकरे यांची रविवारची सभा नेमकी कोठे होणार याचा घोळ गेले आठवडाभर सुरूच होता. त्यासाठी मनसेतर्फे अलका चित्रपटगृहाजवळील टिळक चौक व स.प. महाविद्यालयाच्या मैदानाची मागणी करण्यात आली होती. मात्र, टिळक चौकात सभा घेतली तर वाहतुकीचे तीन-तेरा वाजणार होते. त्यामुळे टिळक चौकाची परवानगी पोलिसांनी नाकारली होती. स.प. महाविद्यालयाची संस्था असलेल्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाने राजकीय सभांसाठी मैदान न देण्याचा निर्णय आधीच घेतलेला आहे. तरीसुद्धा याच जागेचा आग्रह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी धरला. शुक्रवारी सायंकाळपर्यंत या जागांची परवानगी न मिळाल्याने मुठा नदीच्या नदीपात्रात सभा घेणार असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. त्यासाठी तेथील मैदान सपाट करण्याचे कामही शुक्रवारी सुरू झाले होते.
मात्र, तरीसुद्धा शिक्षण प्रसारक मंडळीच्या पदाधिकाऱ्यांवर सर्वच बाजूंनी दबाव टाकण्यात येत होता. याबाबत नाव न छापण्याच्या अटीवर पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्यासह सरकारमधील काही मंत्री तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनीही त्यासाठी दबाव टाकला. कायदा-सुव्यवस्था राहावी यासाठी त्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे आग्रह धरला. याशिवाय परवानगी नाकारली, तर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून नुकसान होण्याची धास्ती होती. याबाबत ‘शिक्षण प्रसारक’च्या नियामक मंडळाची बैठक झाली. त्यात बहुतांश पदाधिकाऱ्यांनी मैदान देण्यास विरोध केला. सध्या परीक्षांचा हंगाम आहे, परिसरातच वसतिगृह आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होण्याची शक्यता ही त्यामागची कारणे होती. तसेच, संस्थेचा ठराव मोडून एका सभेला परवानगी दिली तर इतरांना ती कशी नाकारणार, असाही सवाल पदाधिकाऱ्यांनी केला होता. मात्र, सततच्या दबावाला झुकून अखेर दुपारी परवानगीचे पत्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.