‘संशोधनाला प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षण पद्धतीबरोबरच युवकांना कौशल्य प्रशिक्षणही मिळेल, अशी शिक्षण व्यवस्था निर्माण होणे आवश्यक आहे. सध्याच्या उच्च शिक्षण पद्धतीत बदल करण्याच्यादृष्टीने लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे,’ असे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी सांगितले.
फग्र्युसन महाविद्यालयाच्या स्थापना दिनानिमित्त डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे पहिला ‘राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार’ शनिवारी राव यांच्या हस्ते देण्यात आला. या पुरस्कार प्रदान सोहळ्यात राव बोलत होते. हा पुरस्कार एकल विद्यालय फाउंडेशन या संस्थेला देण्यात आला असून संस्थेच्यावतीने बजरंग बाग्रा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या वर्षीपासून दरवर्षी सामाजिक, पर्यावरण किंवा शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या वेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शाहू छत्रपती, पालकमंत्री गिरीश बापट, उद्योजक अभय फिरोदिया, संस्थेचे सचिव आनंद भिडे, नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अजित पटवर्धन आदी उपस्थित होते.
या वेळी राव म्हणाले, ‘‘लोकसंख्या आणि शिक्षण ही भारताची शक्तिस्थाने आहेत. त्याचा उपयोग आपण कसा करतो त्यावर आपले भवितव्य अवलंबून आहे. भारताचे सरासरी वय हे २०२० मध्ये २९ वर्षे असेल. हे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ असेल, तर अनेक क्षेत्रात भारत आघाडीवर असेल. सध्या चीन आणि इस्राईलपेक्षाही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या या भारतात सुरू होत आहेत. जागतिक स्तरावर भारताचे स्थान निर्माण करण्याचे आव्हान युवकांनी स्वीकारले पाहिजे. त्यासाठी आपल्या उच्च शिक्षण पद्धतीत बदल होणे गरजेचे असून ती अधिक कौशल्यभिमुख व्हावी.’’