केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्याची एफआरपी प्रश्नावर फसवणूक केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी वेळ पडल्यास राज्याची तिजोरीही खाली करू अशी घोषणा केली होती. त्या मुख्यमंत्र्यांचा आम्ही आता शोध घेत आहोत, अशा शब्दांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावरही जोरदार टीका केली.  सहकार मंत्री भामटा आणि चोर असून या चोराच्या हाती तिजोरीच्या चाव्या आहेत, अशा शब्दात त्यांनी सहकार मंत्र्यांचाही खरपूस समाचार घेतला.

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील अलका चौक ते साखर संकुल येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात स्वराज इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव हे देखील उपस्थित होते, तसेच राज्यातील विविध भागातील शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपीची मागणी कित्येक महिन्यांपासून प्रलंबित आहे. अशा साखर कारखानदारांवर सरकारने कारवाई करावी ही मागणी कित्येक वेळा केली. मात्र अद्याप सरकारने कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही. यामुळे आज मोर्चा काढला असून या मोर्चाची दखल न घेतल्यास आणखी तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

योगेंद्र यादव म्हणाले की, ‘भाजपाने सत्तेत येण्यापूर्वी शेतकरी वर्गासाठी अनेक आश्वासने दिली. मात्र पाच वर्षाचा काळ होत आला तरी देखील शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यात हे सरकार अपयशी ठरले असल्याने आज पुण्यात शेतकरी मोर्चा काढत आहे. भविष्यात या मोर्चाची दखल घेऊन शेतकरी सरकार विरोधात मोर्चा काढतील’, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. परिणामी या सरकारने लवकरात लवकर शेतकर्‍यांचे प्रश्न मार्गी लावावे अशी मागणी त्यांनी केली.