स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कितीही नाही म्हटले तरी या दोघांमधील संबंधात दुरावा निर्माण झाल्याचे लपून राहिलेले नाही. हे दोन्ही नेते आज पुण्यात असूनही त्यांनी एकमेकांना भेटण्याचे टाळले. दोघेही एकाच विश्रामगृहात उतरणार होते. परंतु, सदाभाऊंना विश्रामगृहात राजू शेट्टीही येणार असल्याचे समजताच त्यांनी आपला मुक्काम दुसरीकडे हलवला. सदाभाऊंच्या या कृतीमुळे दोघांमध्ये आलबेल नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.
राजू शेट्टी आणि सदाभाऊ हे कामानिमित्त पुण्यात आहेत. योगायोगाने दोघेही एकाच विश्रामगृहात उतरणार होते. सदाभाऊंनी विश्रामगृहाचे आधीच बुकिंग केले होते. राजू शेट्टीही इथे येणार असल्याचे कळताच त्यांनी रजिस्टरमधील आपले नाव खोडले आणि पाणीपुरवठा विभागाच्या विश्रामगृहात जाणे पसंत केले. सदाभाऊंच्या या कृतीमुळे उपस्थितीतही अचंबित झाले. याबाबत सदाभाऊंना विचारले असता त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून दोघांत अबोला असल्यावर शिक्कामोर्तब केला. ते म्हणाले, राजू शेट्टी आणि मी दोघेही जवळ राहतो. पण आमच्यात किती किमी अंतर पडलं आहे, हे मी मोजलेलं नाही. आज आम्ही दोघं पुण्यात आहोत. माझ्या बैठका असल्याने भेट होऊ शकणार नाही. पण नंतर आम्ही भेटणार आहोत.
राजू शेट्टी आणि सदाभाऊ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कटुता आली आहे. नुकताच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राजू शेट्टींच्या इच्छेविरूद्ध सदाभाऊंनी आपल्या मुलाला निवडणुकीत उभे केले होते. राजू शेट्टींनी त्यांच्या मुलाचा प्रचार केला नव्हता. या निवडणुकीत सदाभाऊंच्या मुलाचा पराभव झाला होता. राजू शेट्टींनी प्रचाराला यायला हवे होते, अशी खंत सदाभाऊंनी व्यक्त केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांमध्ये संभाषणही होत नसल्याचे समजते. यापूर्वीही अनेक अशा घटना घडल्या की त्यामुळे या दोघातील अंतर वाढतच गेले.