राज्यातील सरकारला धक्का देऊ शकेल असे संख्याबळ नसले, तरी शेतक ऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी आम्ही सभागृहात आणि रस्त्यावरही येऊन लढणार. आमच्याशी मैत्री ठेवायची की नाही हे तुम्हीच ठरवा, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासराद राजू शेट्टी यांनी भाजपला रविवारी सुनावले.
शेतक ऱ्यांच्या जमिनी बळकावणारा भूमी अधिग्रहण कायदा केंद्र सरकार मंजूर करणार असेल आणि अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार मदत करणार नसेल तर, महायुतीमधून बाहेर पडावे, असा सूर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी व्यक्त केला होता. त्यासंदर्भात विचारले असता राजू शेट्टी म्हणाले, आम्ही आघाडीत असलो काय आणि नसलो काय, त्याने काय फरक पडणार आहे. सरकारला धक्का द्यावे असे संख्याबळ आमच्यापाशी नाही. मी विरोध करूनही लोकसभेमध्ये भूमीधिग्रहण विधेयक संमत झाले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात विरोधी पक्ष जिवंत ठेवला त्याचा फायदा भाजपने घेतला. सत्तेचा तुकडा मिळावा म्हणून भाजपला पाठिंबा दिलाच नव्हता. मात्र, आमच्या पाठिंब्यावर हे सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे सरकार चुकेल तेथे शेतकऱ्यांच्या हितासाठी प्राणपणाने लढणार. आता आम्हाला बरोबर ठेवायचे की नाही हे त्यांनीच ठरवावे.
शहीद दिनी पदयात्रेद्वारे आंदोलन
यापूर्वी ‘विशेष आर्थिक क्षेत्रा’साठी (सेझ) घेतलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत कराव्यात, या मागणीसाठी शहीद दिनी (२३ मार्च) खेडपासून पुण्यापर्यंत पायी चालत येण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे. शेतक ऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका. ज्या हातांनी तुम्हाला खुर्चीवर बसवले ते हात खुर्ची काढून घ्यायला कमी करणार नाहीत, हा इशारा शेतकरी या मोर्चाद्वारे देणार असल्याचेही राजू शेट्टी यांनी सांगितले.