‘वर्षांनुवर्षे सांगितल्या जाणाऱ्या कथा. कानगोष्टींनुसार साकारलेली त्याची वेगळी रूपे. स्थळ-काळानुसार कथांचे बदलेले संदर्भ आणि मांडणी आणि त्याचे तात्कालिक कलेत उमटणारे प्रतिबिंब असा कथनाच्या प्रवासाचा प्रत्यय चित्रकलेच्या माध्यमातून रसिकांना शनिवारी आला.. प्रा. राम बापट स्मृती व्याख्यानात ज्येष्ठ चित्रकार गुलाममोहम्मद शेख यांनी कथनाची ही परंपरा उलगडली.
प्रा. राम बापट स्मृती व्याख्यानाच्या दुसऱ्या वर्षी गुलाममोहम्मद शेख यांनी ‘कहाणी भाषा आणि संहितेची-भारतीय कलेतील कथनाच्या परंपरा’ या विषयावर शनिवारी मांडणी केली. या वेळी ज्येष्ठ चित्रकार सुधीर पटवर्धन, प्राज फाउंडेशनच्या अध्यक्ष परिमल चौधरी आदी उपस्थित होते.
जातककथा, भागवत, रामायण, महाभारत, पंचतंत्र, यांचे चित्ररूपातील दाखले देत शेख यांनी इसवीसन पूर्व काळापासून ते विसाव्या शतकापर्यंतची ‘कथना’ची गोष्ट रसिकांपुढे मांडली. या वेळी शेख म्हणाले, ‘पौराणिक कथा किंवा इतिहासातील काही संदर्भ हे मौखिक प्रसारातून टिकून राहिले आहेत. या कथांच्या किंवा लोककथांच्या मौखिक प्रवासामध्ये स्थानिक संदर्भ मिसळत जातात. त्यामुळे कथेमधील व्यक्तिरेखा, ठिकाण याला स्थानिक वातावरणाचा लहेजा मिळतो. चित्रकार जेव्हा त्याच्या चित्रांच्या माध्यमातून एखादी गोष्ट रेखाटतो. तेव्हा मुळातच बदलणाऱ्या संदर्भामध्ये चित्रकाराच्या कल्पनांची आणि त्याला दिसणाऱ्या प्रतिमांची भर पडते. म्हणूनच एकाच विषयावरील चित्रांमध्ये काळानुसार बदल झालेला दिसतो. बहुतेक वेळा चित्रकाराला दिसणाऱ्या प्रतिमा या तात्कालिक वातावरणातून तयार झालेल्या असतात. त्यामुळे एकाच चित्रातून सांगण्यात आलेल्या गोष्टीवर एका पेक्षा अधिक काळाची छाप दिसू शकते,’ असे सांगून रामायणावर रेखाटलेल्या चित्रांचे उदाहरण शेख यांनी दिले. रामायणातील पौराणिक गोष्टींवर मुघल काळात रेखाटलेली चित्रांमधील व्यक्तिरेखा या मुघल वेशामध्ये दिसून येतात.
शेख पुढे म्हणाले, ‘कथा मौखिक परंपरेतून जतन झाल्या. मात्र, त्याच्या प्रत्येक टप्प्यावर सामाजिक ‘टॅबू’ असलेले संदर्भ वगळले गेल्याचे दिसते. मात्र, अनेकदा चित्रांमधील कथनाच्या प्रवासात चित्रकाराच्या कल्पकतेतून आणि प्रतीकात्मकतेचा वापर करून या टॅबूना बाजूला सारलेले दिसते. कथनाची परंपरा जेवढी मौखिक प्रसारातून समृद्ध झाली आहे. तेवढीच ती चित्रकला आणि शिल्पकलेच्या माध्यमातून समृद्ध झाली आहे.’