पुण्यातील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवल्याची माहिती पुणे पोलिसांना चक्क फेसबुकवरुन समजली. आम्हाला फेसबुकवर संभाजी ब्रिगेडने गडकरींचा पुतळा हटवल्याची माहिती समजली आणि त्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.

जंगली महाराज रोडवरील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पहाटे हटवला. उद्यानात सुरक्षा रक्षक असतानाही हा प्रकार सकाळपर्यंत कसा समजला नाही असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तर दुसरीकडे पोलिसांनाही या घटनेची माहिती नव्हती हे समोर आले आहे. डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कदम यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा प्रकार आम्हाला फेसबुकद्वारे समजला. संभाजी ब्रिगेडच्या फेसबुकवर हा पुतळा काढल्याची पोस्ट होती. त्यानंतर आम्ही लगेच घटनास्थळी आलो’ असे कदम यांनी म्हटले आहे. उद्यानात सीसीटीव्ही कॅमेरेही आहेत. या कॅमे-याचे फुटेज गोळा करण्याचे काम सुरु आहे. पुतळा हटवणारे कोण होते याविषयी अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पण लवकरच आरोपींवर कारवाई करु असे त्यांनी सांगितले.

पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जंगली महाराज रोडवर संभाजी उद्यान आहे. मुठा नदी किनारी वसलेल्या या उद्यानात नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा आहे. १९६२ मध्ये आचार्य अत्रे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हा पुतळा होता.  राम गणेश गडकरी स्मारक समितीने पुणे महापालिकेला हा पुतळा भेट म्हणून देण्यात आला होता.  मंगळवारी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास संभाजी ब्रिगेडच्या १० ते १५ कार्यकर्त्यांनी राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवला. हा पुतळा मुठा नदीत फेकण्यात आला होता. मंगळवारी सकाळी उद्यान उघडल्यावर हा सर्व प्रकार समोर आला.