काळा पैसा देशात आणण्याबाबत काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे एकाच माळेचे मणी आहेत, अशी टीका माजी केंद्रीय कायदामंत्री राम जेठमलानी यांनी रविवारी केली. स्विस बँकेतून काळा पैसा देशात परत आणण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची घोषणा हे केवळ आश्वासनच ठरले आहे. निवडणूक प्रचारामध्ये दिलेली ही आश्वासने पाळली नाहीत तर, बिहारप्रमाणेच अन्य राज्यांचे निकालही सरकारच्या विरोधात जातील, असा इशाराही त्यांनी दिला.
‘टॉप मॅनेजमेंट कॉन्सोर्टियम’तर्फे (टीएमसी) ‘इफेक्टिव्ह फंक्शनिंग ऑफ पार्लमेंट फॉर व्हायब्रंट डेमोक्रॅसी’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्रात जेठमलानी बोलत होते. सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत, लोकसभेचे माजी सरचिटणीस सुभाष कश्यप, ‘टीएमसी’चे अध्यक्ष बी. आर. मल्होत्रा या वेळी उपस्थित होते.
जेठमलानी म्हणाले,‘‘जर्मनीने स्वित्र्झलडमधील बँकेकडून काळ्या पैसेधारकांची यादी मिळविली. कोणत्याही देशाने मागितल्यास ही यादी मोफत देण्याची तयारीही जर्मनीने दर्शविली होती. मात्र, ही यादी मिळविण्यासंदर्भात भारताने कोणताही पत्रव्यवहार केला नाही. उलट स्वित्र्झलडबरोबर पूर्वीचे काही मागणार नाही असा करार केला. त्यानंतरही विरोधी पक्षातील असल्याने मी ती यादी मिळावी अशी मागणी केली होती. मात्र, बँकेतर्फे मला ‘विरोधी पक्षनेत्याचे पत्र द्या’, असे सांगण्यात आले होते. ते पत्र मला त्यावेळचे विरोधी पक्षनेते लालकृष्ण आडवाणी यांनी दिले नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने हाच प्रचाराचा मुद्दा करीत मोदी आणि जेटली यांनी काळा पैसा देशात परत आणण्याचे आश्वासन जनतेला दिले. मात्र, काळा पैसा आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न न केल्यामुळे काँग्रेस आणि भाजप हे एकाच माळेचे मणी ठरले आहेत.’’
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 15, 2016 3:23 am