२१ आणि २२ मे रोजी संमेलन
धर्मनिरपेक्षवादी कार्यकर्ते- लेखक राम पुनियानी यांची १४ व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे २१ आणि २२ मे रोजी पर्वती पायथा येथील दलाच्या संस्थेने येथे हे संमेलन होणार आहे.
विठ्ठल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संयोजन समितीच्या बैठकीत राम पुनियानी यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. राम पुनियानी गेल्या १५ वर्षांपासून देशभर धर्मनिरपेक्षवादी विचारांची प्रभावी मांडणी करीत आहेत. धार्मिक अल्पसंख्याकांवर झालेल्या हिंसात्मक हल्ल्याच्या चौकशी समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. जातीयवादी हिंसात्मक राजकारणाविषयी सातत्याने विचारांची मांडणी करणाऱ्या पुनियानी यांच्यावर गांधीवादी विचारांचा प्रभाव आहे. संघाच्या हुकुमशाही विचारांवर त्यांनी सडेतोड विचार मांडले आहेत. इंदिरा गांधी नॅशनल इंटिग्रेशन अ‍ॅवॉर्ड आणि नॅशनल कम्युनल हार्मनी अ‍ॅवॉर्ड या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.