देशाची सेवा करणाऱ्या राष्ट्रपुरुषांचे पुतळे माझ्या हातून घडले. मी घडविलेले महात्मा गांधी यांचे १२० पुतळे देशात आणि देशाबाहेर गेले आहेत. माझ्यामध्ये शिल्प घडविण्याची अजूनही उमेद कायम आहे, अशी भावना ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनी रविवारी व्यक्त केली.
जय हिंदू परिवार आणि नाते समाजाशी यांच्यातर्फे माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते राम सुतार आणि ‘सुदर्शन वाहिनी’चे संपादक सुरेश चव्हाणके यांना ‘आंतरराष्ट्रीय महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोकमंगल उद्योगसमूहाचे सुभाष देशमुख, राष्ट्रसंत तुकडोजीमहाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी, श्यामजी महाराज राठोड, सामाजिक कार्यकर्ते बाप्पूसाहेब भोसले, अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या अध्यक्षा रत्ना वाघ, कर्नल मोहन काकतीकर यांना राष्ट्रीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. डी. एस. कुलकर्णी यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव शिरीष कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नारायण फड, विजय वरुडकर आणि संतोष ढाकणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.