राहुल यांनी काँग्रेस वाचवावी; रामदास आठवले यांचा टोला

संविधान अडचणीत आल्याची आवई उठवून ते वाचवण्याची भाषा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी करत असतात. परंतु, संविधान वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी खंबीर आहोत. राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्ष वाचवावा, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी रविवारी लगावला. नरेंद्र मोदी यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळात दलितांसाठी अनेक कामे मार्गी लागली आहेत, असेही त्यांनी सांगितले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात आठवले बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वनिचित्रफितीद्वारे आरपीआयच्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

आठवले म्हणाले, की मोदींच्या कार्यकाळात महू येथील संग्रहालय, इंदू मील येथील स्मारक, दीक्षा भूमी, लंडन येथील बाबासाहेबांचे घर अशी विविध कामे पूर्ण झाली आहेत. परंतु, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी ‘संविधान बचाओ’चा नारा देत असतात. मात्र, त्यांनी काँग्रेस बचाव आंदोलन केले पाहिजे. भीमा कोरेगाव हिंसाचाराबाबत पुरावे मिळत नसल्यास आणखी शोध घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. दलितांचे आरक्षण आणि संविधान यांना धक्का लावणार नसल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिली आहे. भारतीय जनता पक्षाला विनाकारण बदनाम करण्याची मोहीम आखली जात आहे.  समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठीच आम्ही भाजपसोबत आहोत. संविधानाला धक्का लागल्यास मंत्रिपद सोडू, असेही आठवले यांनी या वेळी सांगितले.

बापट म्हणाले, की भाजप आणि रिपब्लिकन पक्षाची युती अभेद्य असून घटना, आरक्षण यांबाबत समाजात गैरसमज पसरवण्याचे काम काही समाजकंटकांकडून केले जात आहे.  कांबळे म्हणाले, की भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी निवृत्त न्यायाधीशांची चौकशी समिती नेमण्यात आली असून येत्या दोन महिन्यात हिंसाचारातील सत्य बाहेर येईल. तसेच रिपब्लिकन पक्षातील कार्यकर्त्यांना विविध महामंडळात काम करण्याची संधी देण्याबाबत पुढील आठवडय़ात निर्णय घेतला जाणार आहे.

२०१९ मध्ये आरपीआय भाजपसोबत

शिवसेना आणि भाजप यांची युती व्हावी, अशीच आमची भूमिका आहे. परंतु, शिवसेना आमच्यासोबत आली नाही, तर रिपब्लिकन पक्ष भाजपसोबतच राहणार असून २०१९ मध्ये केंद्रात पुन्हा सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन रामदास आठवले यांनी अधिवेशनात केले.