आठवले यांच्या दाव्याने भाजप-शिवसेनेची पंचाईत

पिंपरी : भाजप-शिवसेना-रिपाइं यांच्यात निवडणूकपूर्व आघाडी होईल की नाही, हे गुलदस्त्यात असताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पिंपरी (राखीव) विधानसभा मतदारसंघावर जोरदार दावा केला आहे. भाजप-शिवसेनेची युती होवो किंवा नाही, पिंपरी मतदारसंघाच्या मुद्यावरून भाजपला मोठय़ा डोकेदुखीला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

शहरात चिंचवड, पिंपरी आणि भोसरी असे विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत. त्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघ मागासवर्गीयांसाठी राखीव आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना हे पक्ष स्वतंत्र लढले, तेव्हा भाजपने युती असलेल्या रिपाइंला पिंपरीची जागा सोडली होती. शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार येथून निवडून आले आणि भाजप-रिपाइं आघाडीच्या चंद्रकांता सोनकांबळे थोडय़ा फरकाने पराभूत झाल्या. पिंपरीतून रिपाइंचा आमदार होऊ शकतो, असे लक्षात आल्यामुळे आठवले यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच ते सातत्याने या मतदारसंघावर दावा करत आले आहेत.

पिंपरी दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषदेत या मागणीचा पुनरुच्चार केला. पिंपरी मतदारसंघ आमचा आहे. जागावाटपाचा निर्णय योग्य वेळी होईल. पिंपरीत सध्या शिवसेनेचा आमदार असला तरी आगामी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा आमदार होईल, असे सूचक विधान आठवले यांनी या वेळी केले. त्यामुळे पिंपरीच्या जागेवरून भविष्यात भाजप-शिवसेना आणि रिपाइं यांच्यात संघर्षांची चिन्हे आहेत.

आगामी काळात भाजप-रिपब्लिकन यांच्यातील युती कायम राहणार असल्याचे आठवले यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. सध्या पिंपरीत शिवसेनेचा आमदार आहे. तीनही पक्षांची युती झाली तर सर्वानाच डोकेदुखीला सामोरे जावे लागणार आहे.

शिवसेना-भाजप युती झाल्यास पिंपरीचा दावा शिवसेना सोडण्याची शक्यता नाही. तसेच, शिवसेनेशी भाजपची युती न झाल्यास रिपाइंकडून पिंपरीवर ठाम दावा केला जाणार आहे. भाजपकडून पिंपरीसाठी इच्छुकांची मोठी रांग आहे. आताचे खासदार अमर साबळे यांनी २००९ मध्ये पिंपरीतून निवडणूक लढवली होती, तेव्हा ते राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांच्याकडून थोडक्यात पराभूत झाले होते. भाजपला पिंपरीत विजयाची संधी असल्याचे तेव्हाच स्पष्ट झाले होते. त्यामुळे भाजपनेही पिंपरीवर लक्ष केंद्रित केले आहे, मात्र आठवले आग्रही राहिल्यास भाजपची अडचण होणार असल्याचे दिसून येते.