देशातील नव्हे, तर जगातील सर्वात भ्रष्ट पक्षाशी ‘आप’ ने हातमिळवणी का केली, असा प्रश्न विचारत योगगुरू रामदेव बाबा यांनी शनिवारी अरविंद केजरीवाल यांच्यावर तोफ डागली. नरेंद्र मोदी  प्रामाणिक व सच्चे देशभक्त असूनही केजरीवाल यांनी त्यांच्या पक्षाला पाठिंबा का दिला नाही, असा प्रश्न उपस्थित करतानाच राहुल गांधी यांच्याकडे गांधी आडनावाखेरीज काहीही नाही, असाही टोमणा त्यांनी मारला.
‘भारत स्वाभिमान न्यास’ तर्फे २३ मार्चपासून योग महोत्सव भरवला जाणार आहे. या महोत्सवात व्होट फॉर मोदी हा उपक्रमही होणार आहे. या महोत्सवाची माहिती देण्यासाठी रामदेव बाबा यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन येथे करण्यात आले होते. आपल्या देशात २०१४ साली मोठे परिवर्तन घडणार आहे. जाती आणि अन्य लहान-मोठय़ा गोष्टींवर आधारलेले राजकारण संपणार असून येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस निश्चितपणे पराभूत होणार आहे, असा दावा रामदेव बाबा यांनी यावेळी केला. देशापुढे आता नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल असे तीन पर्याय आहेत. त्यात काँग्रेसनंतर आता स्थिर सरकार कोण देणार याचा विचार जनतेला करावा लागणार आहे, असेही ते म्हणाले. ‘आप’ ने प्रामाणिकपणाची घोषणा केली होती. देशभक्तीची घोषणा केली होती आणि दिल्लीच्या व्हीआयपी संस्कृतीलाही विरोध केला होता. ही संस्कृती मोडण्याची सुरुवात नरेंद्र मोदी यांनीच केली आहे; मग ‘आप’ ने सत्ता स्थापन करण्यासाठी जगातील सर्वात भ्रष्ट पक्षाशी हातमिळवणी केली, अशीही विचारणा त्यांनी केली.
मोदी यांनी स्वकर्तृत्वाने देशात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. प्रामाणिक व सच्चा देशभक्त, भावी पंतप्रधान म्हणून देश त्यांच्याकडे पाहात आहे. मात्र, या उलट बिचाऱ्या राहुल गांधी यांच्याकडे गांधी आडनाव सोडून बाकी काहीच नाही, असाही टोमणा रामदेव बाबा यांनी मारला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याबद्दल विचारले असता, तो तर एक फकीर माणूस आहे. त्यांच्याबद्दल काय बोलायचे असे ते म्हणाले.