मुख्य अभियंता निळकंठ वाडेकर हे सेवानिवृत्त झाल्यामुळे महावितरणच्या पुणे विभागाच्या मुख्य अभियंत्याच्या रिक्त जागेवर दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अधिकाऱ्याची नेमणूक झाली आहे. बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता रामराव मुंडे यांची पुणे परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी नियुक्ती झाली असून, त्यांनी बुधवारी पदाचा कार्यभार स्वीकारला.
वाडेकर हे ३० जूनला निवृत्त झाले होते. त्यामुळे भालचंद्र खंडाईत हे प्रभारी मुख्य अभियंता म्हणून कार्यभार पाहत होते. मात्र, राज्यात सर्वात महत्त्वाच्या असलेल्या पुणे परिमंडलात दोन महिने मुख्य अभियंत्याची नेमणूक होत नसल्याबद्दल आक्षेपही नोंदविण्यात आले होते. त्यानंतर अखेर मुंडे यांची या पदावर नेमणूक करण्यात आली. मुंडे हे तत्कालीन वीज मंडळामध्ये १९८२ मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून दाखल झाले होते. त्यानंतर सहायक अभियंता, उपकार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता या पदावर त्यांनी बीड, भांडूप, ठाणे वाशी, नेरुळ आदी ठिकाणी काम केले.
लातूर परिमंडलात मुख्य अभियंता म्हणून काम करताना त्यांनी कृषीपंपांना तातडीने वीजजोडणी देण्यासाठी ‘महावितरण आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला होता. या उपक्रमाच्या यशामुळे तो राज्यभर राबविण्यात आला. दुर्गम भागात वीजपुरवठा सुरळीत करण्यातही त्यांचे योगदान आहे. पुणे परिमंडलात वेगवान उत्कृष्ट ग्राहकसेवा तसेच इन्फ्रा दोनसह विविध योजनांतील कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले.