News Flash

रमजानसाठी ५०० प्रकारचे खजूर उपलब्ध, पण विक्री मंदावली

रमजानच्या महिन्यातील उपवास (रोजे) खजूर खाऊन सोडले जातात. त्यासाठी इतर पदार्थापेक्षा खजुराला अधिक महत्त्व असते. त्यामुळे या महिन्यात खजुराची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढते.

| July 18, 2014 03:15 am

मुस्लीम धर्मियांच्या पवित्र ‘रमजान’ च्या महिन्यात पुण्यातील बाजारपेठेत खजुराची उलाढाल कितीतरी पटींनी वाढते खरी, पण या वेळी आर्थिक मंदी आणि दुष्काळाचा परिणाम या बाजारपेठेवरही झाला आहे. त्यामुळे रमजान महिन्यातील खजुराची तब्बल २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त होणारी उलाढाल या वेळी तुलनेने बरीच कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
रमजानच्या महिन्यातील उपवास (रोजे) खजूर खाऊन सोडले जातात. त्यासाठी इतर पदार्थापेक्षा खजुराला अधिक महत्त्व असते. त्यामुळे या महिन्यात खजुराची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढते. ही गरज भागविण्यासाठी पुण्यातील बाजारपेठेत दुबई, इराण, इराक, सौदी अरेबिया, तुर्की, अफगाणिस्तान, इंडोनेशिया, इस्रायल येथील प्रसिद्ध खजुरांची आयात झाली आहे. मुख्यत: लष्कर भागातील शिवाजी मार्केट, महात्मा फुले पेठेतील मोमीनपुरा, कोंढवा, अशा परिसरात त्याच्या विविध जाती उपलब्ध आहेत. पुण्यात तब्बल ५०० हून अधिक प्रकारचे खजूर उपलब्ध झाले आहेत. त्याचे प्रतिकिलोचे दर कमीत कमी ६० रुपयांपासून जास्तीत जास्त ६ हजार रुपयांपर्यंत आहेत. या वेळी सौदी अरेबियामधील ‘अजुवा’ आणि बगदादमधील ‘अंबर’ या जातीच्या खजुराला मोठी मागणी आहे.
कोंढवा येथील खजूर व्यापारी अकिल बागवान यांनी याबाबत सांगितले की, एरवी संपूर्ण महिन्याला एक पेटी खजुराची विक्री होते. मात्र, रमजान महिन्यात दररोज इतकी विक्री होते. त्यामुळे या महिन्यात आपली निव्वळ खजुराची उलाढाल तब्बल ३० ते ३५ लाख रुपयांपर्यंत होते. पुण्यात खजुराची विक्री करणारे लहान-मोठे असे सुमारे शंभरहून अधिक व्यापारी आहेत. त्यामुळे पुण्यात सुमारे २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल होते. या वर्षी मात्र त्यात मोठा फरक पडला आहे. एरवी रमजान महिन्यात माल आणण्यासाठी चार-पाच वेळा मुंबईला जावे लागते. मात्र, या वर्षी एकदाच जाऊन आलो.
बागवान यांच्याप्रमाणेच इतरही व्यापाऱ्यांची अशीच स्थिती आहे. त्यांचीसुद्धा उलाढाल मंदावल्यामुळे या वर्षी त्यांच्यासाठी खजुराची गोडी कमी झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2014 3:15 am

Web Title: ramzan eid date turnover varieties
टॅग : Turnover
Next Stories
1 पावसाचा दिलासा; धरणसाठय़ांत काहीशी वाढ!
2 पावसाळी पर्यटनस्थळांना दिलासा
3 पुणे मेट्रो प्रकल्पासाठीचे बदल विकास आराखडय़ातच का नाहीत?
Just Now!
X