खडतर प्रशिक्षणानंतर श्वानांचा समावेश

पुणे : गंभीर गुन्हय़ांच्या तपासात संशयितांचा माग काढणे असो वा घातपाती कारवायांमध्ये बॉम्बशोधक नाशक पथकातील (बीडीडीएस) श्वान महत्त्वाची भूमिका बजावतात. पुणे पोलिसांच्या बॉम्बशोधक नाशक पथकात खडतर प्रशिक्षणानंतर राणा आणि धुव्र हे दोन श्वान दाखल झाले आहेत.

पुणे पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकात सध्या तेजा, लिमा, टायसन, सूर्या, विराट हे श्वान कार्यरत आहेत. दीड वर्षांपूर्वी बॉम्बशोधक पथकातील आझाद नावाचा श्वान निवृत्त झाला. साधारणपणे बॉम्बशोधक पथकात काम करणाऱ्या श्वानाला आठ ते नऊ वर्षांनंतर कामातून निवृत्त केले जाते. बॉम्बशोधक पथकात काम करणाऱ्या श्वानाच्या श्वसनक्षमतेवर परिणाम होत असल्यामुळे देशभरातील बॉम्बशोधक पथकातील श्वानांचे निवृत्तीचे वय निश्चित करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकातून आझाद निवृत्त झाल्यानंतर आणखी एका श्वानाचे पिलू खरेदी करण्यात आले. त्याचे नामकरण विराट असे करण्यात आले. प्रशिक्षणानंतर विराट वर्षभरापासून बॉम्बशोधक पथकात कार्यरत आहे. त्यानंतर लॅब्रॅडोर जातीची दोन पिले खरेदी करण्यात आली. त्यांचे नामकरण राणा आणि धुव्र करण्यात आले. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी डॉग ट्रेनिंग सेंटर) श्वान प्रशिक्षण केंद्रात दोघांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले, अशी माहिती पुणे पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकातील सूत्रांनी दिली.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या श्वान प्रशिक्षण केंद्रातील महाराष्ट्र पोलीस दलातील श्वानांना प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षण कालावधी साधारणपणे सहा ते आठ महिन्यांचा असतो. प्रत्येक श्वानाची प्रशिक्षण घेण्याची क्षमता विचारात घेऊन त्याला प्रशिक्षण दिले जाते. स्फोटके शोधून काढणे तसेच संशयितांचा माग काढणे अशा प्रकारचे प्रशिक्षण श्वानांना दिले जाते. हे प्रशिक्षण खडतर असते.

लॅब्रॅडोरला पसंती

पोलीस दलात बॉम्बशोधक पथकात लॅब्रॅडोर जातीच्या श्वानांना पसंती दिली जाते. हे श्वान शांत आणि संयमी असतात. शहरी भागात संशयितांचा माग काढणे किंवा स्फोटक हुडकून काढण्यासाठी लॅब्रॅडोरचा वापर केला जातो. शहरी भागात वर्दळ जास्त असते. त्यामुळे पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकांकडून संयमी आणि शांत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॅब्रॅडोर जातीच्या श्वानांना पसंती दिली जाते.

धुव्र प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

सीआयडीच्या श्वान प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या राज्यातील श्वानांची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत पुणे पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकातील धुव्रची कामगिरी सरस ठरली. वर्षभरापूर्वी पुणे पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकात दाखल झालेल्या विराटने देशपातळीवर पोलीस कर्तव्य मेळाव्यात पहिला क्रमांक पटकाविला.