चिन्मय पाटणकर

छोटय़ा स्वरूपाच्या कार्यक्रमांसाठी आवश्यक असलेला छोटा रंगावकाश ‘रंगालय’ या नव्या सभागृहाच्या रूपात महाराष्ट्र कल्चरल सेंटरनं उपलब्ध करून दिला आहे. ज्येष्ठ अभिनेता चंद्रकांत काळे यांच्या ‘नाटक्याचे तारे’ या अभिवाचनाने गुरुवारी (२५ एप्रिल) सायंकाळी साडेसात वाजता या ‘रंगालय’चे उद्घाटन होत आहे.

सातत्यपूर्ण नाटय़निर्मितीसाठी पुण्याची ख्याती आहेच, मात्र अभिवाचन, रसग्रहणात्मक चर्चा, कार्यशाळा अशा नाटय़पूरक उपक्रमांचीही रेलचेल पुण्यात असते. या छोटेखानी कलाकृतींसाठी, उपक्रमांसाठी गरज असते ती समीप सभागृहांची.. सध्या जागा अनुपलब्ध होण्यातील अडचणींमुळे अशा छोटेखानी कार्यक्रमांना मर्यादा येतात. रंगकर्मी, कलाकारांना हा अवकाश महाराष्ट्र कल्चरल सेंटरनं उपलब्ध करून दिला आहे. खास छोटेखानी कार्यक्रमांसाठी ‘रंगालय’ ही नवी जागा विकसित करण्यात आली आहे. ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत काळे यांच्या ‘नाटक्याचे तारे’ या अभिवाचनाने गुरुवारी (२५ एप्रिल) सायंकाळी साडेसात वाजता या ‘रंगालय’चे उद्घाटन होत आहे.

महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या हिराबाग येथील ज्योत्स्ना भोळे सभागृहाच्या इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर हे रंगालय विकसित करण्यात आलं आहे. त्यात सुमारे पन्नास ते साठ प्रेक्षकांना बसता येऊ  शकेल तसेच कार्यक्रमांसाठी ध्वनी, प्रकाश आदी व्यवस्था असेल. प्रोजेक्शनही करता येईल. त्यामुळे संगीत मैफील, कथाकथन, अभिवाचन, काव्यवाचन असे छोटय़ा स्वरूपाचे कार्यक्रम या जागेत सहज करता येऊ  शकतात. ‘रंगालय’च्या माध्यमातून विविध प्रकारच्या उपक्रमांना चालना मिळू शकेल. वाचन कट्टा तयार होऊ  शकतो. छोटय़ा संगीत मैफिली करता येऊ  शकतात. चित्रपटाचं स्क्रीनिंग केलं जाऊ  शकतं. त्यामुळे कलाकारांसाठी नवी जागा विकसित होण्यापलीकडे प्रेक्षक विकसित होण्यासाठीही ही जागा उपयुक्त ठरेल.

नवा रंगावकाश विकसित करण्याच्या कल्पनेविषयी महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या प्रमोद काळे यांनी लोकसत्ताला माहिती दिली. ‘कलाकारांचे अनेक गट अभिवाचन, काव्यवाचन, रसग्रहणात्मक चर्चा, चित्रपट पाहणे असे खूप काम करतात. मात्र, या उपक्रमांसाठी खास अशी जागा उपलब्ध होत नाही. मग कुणाच्या तरी घरात हे कार्यक्रम होतात. जागा कमी असल्याने प्रेक्षकांना सामावून घेण्यातही मर्यादा येतात. मोठय़ा जागेत कार्यक्रम करून प्रेक्षक आले नाही, तर कलाकार हिरमुसले होतात. त्यामुळे छोटेखानी कार्यक्रमांसाठी तितक्याच छोटय़ा जागेची मोठी गरज आहे. ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न ‘रंगालय’द्वारे केला जात आहे,’ असं काळे यांनी सांगितलं.

येत्या शनिवारी आणि रविवारी नाटय़ संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या उपस्थितीत नाटय़ परिषद आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्यातर्फे तीन नाटय़संहितांचे वाचन आणि चर्चा असा कार्यक्रमही ‘रंगालय’मध्ये होणार आहे.