कोणत्याही वस्तूचे उत्पादन केल्यानंतर त्याचे मार्केटिंग करण्यासाठी लोगो हा फार महत्त्वाचा असतो. अनेक कंपन्यांच्या उत्पादनाची ओळख ही त्यांच्या लोगोवरूनच होते. त्यामुळे राज्य कारागृहानेही त्यांच्याकडे उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तूंचे मार्केटिंग करण्यासाठी त्यांचा ‘मका’ (महाराष्ट्र कारागृह) नावाचा स्वतंत्र लोगो तयार केला आहे.
राज्य कारागृहाच्या ‘मका’ या लोगोचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहामार्फत उत्पादित वस्तूंसाठी हा लोगो वापरण्यात येत होता. आता यापुढे राज्यातील सर्व कारागृहातील वस्तूंची विक्री ‘मका’ याच लोगोमार्फत केली जाणार आहे. या लोगोच्या उद्घाटनप्रसंगी राज्याच्या कारागृह प्रमुख मीरा बोरवणकर, येरवडा कारागृहाचे अधीक्षक योगेश देसाई आदी उपस्थित होते. राज्य कारागृहामार्फत बेकरीचे उत्पादन, लाकडापासून वस्तू, कागदी पिशव्या, पेंटिंग, कलाकुसरीच्या वस्तू, शेतीचे उत्पादन घेतले जाते. या उत्पादनातून कारागृहाची गरज भागवून मोठय़ा प्रमाणात कारागृह विभागाला नफा होतो. गेल्या काही वर्षांपासून कारागृहाचे उत्पादन वाढत असून वस्तूंचा दर्जा फारच चांगला आहे. त्यामुळे या वस्तूंना चांगली मागणी आहे. या वस्तू विकण्यासाठी कारागृहाकडून त्यांचा एक लोगो असवा म्हणून ‘मका’ लोगो जुलै महिन्यात तयार करण्यात आला. या लोगोवरून सुरुवातीला येरवडा कारागृहात उत्पादित होणाऱ्या वस्तूंची विक्री केली जात होती. आता राज्यातील सर्व वस्तूंच्या विक्रीसाठी याचा वापर केला जाणार आहे.
याबाबत राज्याच्या कारागृह विभागाच्या प्रमुख मीरा बोरवणकर म्हणाल्या की, राज्यात एकूण ४९ कारागृह आहेत. या ठिकाणी कैद्यांनी केलेल्या कामातून अनेक वस्तू तयार केल्या जातात. त्यांच्या विक्रीसाठी लोगो नव्हता. तो लोगो आम्ही तयार केला. या दरम्यान अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा मर्दानी हा चित्रपट आला. त्यांनी कैदी, क्राईम सोशल जस्टीस आणि महिलांसाठी काही तरी काम करायचे असल्याचे सांगितले. त्यांनी कारागृहासाठी तयार केलेल्या लोगोचे उद्घाटन करण्यास येणार असल्याचे सांगितले होते. तसेच, त्यांनी महिला कारागृहासाठी काही तरी भेट देण्याचे ठरविले होते. त्यानुसार त्यांनी आज ईसीजी यंत्र महिला कारागृहाच्या अधीक्षकांकडे सुपूर्द केले.