News Flash

रांजणगाव भूखंड व्यवहारात राजकीय हस्तक्षेपाचा संशय

राजकीय वजन वापरून जमीन खरेदीची प्रक्रिया सुकर केली असल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 

भूखंडावर ‘एमआयडीसी’चाच ताबा असल्याचे स्पष्टीकरण

मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख धनंजय कमलाकर यांचा पुत्र रोहित व अन्य चौघांनी रांजणगाव पंचतारांकित एमआयडीसीमधील तब्बत २१ एकर जागा गैरव्यवहारातून खरेदी केल्याचे प्रकरण पुढे आल्याने खळबळ उडाली असून, या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने याबाबत स्पष्टीकरण दिले असून, या जागेचा ताबा एमआयडीसीकडेच असून, फेरफार व इतर हक्कांमध्येही एमआयडीसीचे नाव असल्याचे म्हटले आहे.

विभागीय अधिकारी अजित देशमुख याबाबत म्हणाले, ‘‘औद्योगिक विकास महामंडळाकडून १९८८ पासून त्या ठिकाणी भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्यात आली. संबंधित जमिनीचा ताबा १९९३ पासून महामंडळाला मिळाला आहे. तो आजवर कायम आहे. याच जमिनीवर महामंडळाचा सीईटीपीचा प्रकल्पही कार्यान्वित आहे. शिवाजी नवले व अरुण नवले हे संबंधित जमिनीचे मूळ मालक आहेत. संपादनाच्या प्रक्रियेत त्यांना भरपाईचे पैसेही देण्यात आले आहेत. त्यांनी ते स्वीकारल्याची कागदपत्रेही उपलब्ध आहेत. मालकी हक्काबाबत संबंधितांचा अर्ज दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर पुणे यांनी फेटाळला असून, आता याबाबत जिल्हा न्यायालयात अपिल आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने मालकी हक्काबाबत आपण भाष्य करू शकत नाही.’’

एमआयडीसीचे वकील अभिजित शिंदेकर यांनी सांगितले, ‘‘भूसंपादनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच संबंधित भूखंड एमआयडीसीच्या ताब्यात आहे. जमिनीचा फेरफार झाला होता, मात्र सात-बाऱ्यावर नाव आले नसल्याने त्याचा गैरफायदा घेऊन जमिनीचा व्यवहार करण्यात आला. या जमिनीबाबत सध्या जैसे थे स्थिती ठेवण्याचा न्यायालयाचा आदेश असून, याबाबतची पुढील सुनावणी ३० जूनला होणार आहे.’’

रांजणगाव एमआयडीसीच्या गट क्रमांक ४४३ च्या बफर झोनमधील ही जमीन असून, एमआयडीसीचा एक प्रकल्पही तेथे कार्यान्वित आहे, असे असतानाही या जागेचा व्यवहार झाल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळेच यासाठी राजकीय वजन वापरून जमीन खरेदीची प्रक्रिया सुकर केली असल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2016 3:25 am

Web Title: ranjangaon land transactions issue
टॅग : Midc
Next Stories
1 दंतवैद्यक महाविद्यालयांची मान्यता रखडणार?
2 राज्याचा नवा सहकार कायदा विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात
3 झाडे जगवण्यासाठी ‘ट्री क्रेडिट’!
Just Now!
X