मूल्यांकनात पहिल्या पाच क्रमांकामध्येही पुण्याला स्थान नाही; प्रदूषण कमी करण्यासंबंधित उपाययोजना राबवण्यात मात्र अग्रेसर

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याने देशातील सर्वात चांगल्या आणि राहण्यास योग्य असलेल्या शहरांच्या यादीत पहिले स्थान पटकाविले असले तरी, संस्थात्मक, सामाजिक, आर्थिक आणि भौतिक सुविधा या श्रेणींमध्ये आणि आरोग्य, आर्थिक घटक, वीजपुरवठा, सुरक्षितता आदी ७८ निर्देशांकांच्या आधारे करण्यात आलेल्या मूल्यमापनामध्ये पुणे पिछाडीवरच आहे. विशेष म्हणजे, श्रेणी आणि निर्देशांक मूल्यांकनात पहिल्या पाच क्रमांकामध्येही पुण्याला स्थान मिळविता आलेले नाही. मात्र तरीही पुणे सरासरीच्या आधारे अन्य शहरांच्या तुलनेत अव्वल ठरले आहे.

केंद्रीय शहरी मंत्रालयाने राहण्यास योग्य असलेल्या शहरांची यादी सोमवारी जाहीर केली. यामध्ये पुण्याने देशपातळीवर प्रथम क्रमांक पटकाविला आहे. देशातील १११ शहरांमध्ये केंद्रीय शहरी मंत्रालयाकडून सर्वेक्षण करण्यात आले. शहरांची निवड करताना संस्थात्मक रचना, प्रशासन, सामाजिक पायाभूत सुविधा यात शिक्षण आणि आरोग्य त्याचबरोबर आर्थिक घटक आणि पायाभूत सुविधा या घटकांचा विचार करण्यात आला. त्यात पुणे अव्वल असले तरी सर्वेक्षणासाठीचे निकष, त्याचे उपघटक, निर्देशांक अशा बाबींमध्ये पुण्याला पहिल्या पाच क्रमांकामध्येही स्थान मिळविता आलेले नाही.

संस्थात्मक रचना, सामाजिक, आर्थिक हे मुख्य निकष आणि प्रशासन, शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता, रोजगार, वीजपुरवठा, जमिनीचा वापर, शाश्वत वाहतूक आणि प्रवाससाधने, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन अशा वर्गवारीत विभागून हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात मोकळ्या जागा, दर्जेदार आरोग्य सुविधा, प्रदूषण कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना ही वर्गवारी सोडल्यास अन्य कोणत्याही घटकात शहराला पहिल्या पाच क्रमांकामध्ये स्थान मिळविता आलेले नाही. प्रदूषण कमी करण्यात आलेल्या उपायोजना ग्राह्य़ धरून पुण्याला अन्य शहरांच्या तुलनेत दुसऱ्या क्रमांकाचे मानांकन देण्यात आले आहे. वीजपुरवठय़ामध्ये शहर दहाव्या क्रमांकावर असून नवी मुंबई ७४ व्या स्थानी आहे. प्रशासनामध्ये नवी मुंबईला पहिले मानांकन असून या वर्गवारीत शहर आठव्या स्थानावर आहे. शिक्षणात नवी मुंबई अव्वल असून पुणे आठव्या स्थानी आहे. आरोग्याच्या बाबतीमध्ये नवी मुंबई आणि पुण्यात फारसे अंतर नसून या दोन्ही शहरांना अनुक्रमे चौथे आणि तिसरे गुणांकन देण्यात आले आहे.

प्रशासन, शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता, रोजगार, वीजपुरवठा, जमिनीचा वापर, शाश्वत वाहतूक आणि वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन अशा वर्गवारीत पिछाडी असली, तरी सरासरीच्या आधारे पुणे शहर अव्वल ठरले आहे.