पुणे, पिंपरी पालिका निवडणूक
भाजपच्या भूमिकेमुळे चित्र बदलण्याची शक्यता
कार्यकर्त्यांनी युतीचा विचार न करता पुढील वर्षी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेत होणाऱ्या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याच्या तयारीत राहावे, असे आदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रविवारी कार्यकर्त्यांना दिले. दानवे यांच्या या आदेशामुळे आगामी पालिका निवडणुकीतील चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दानवे यांनी रविवारी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली व कार्यकर्त्यांशीही संवाद साधला. पालकमंत्री गिरीश बापट, भाजपचे संघटनमंत्री रवी अनासपुरे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर, प्रदेश सरचिटणीस धीरज घाटे आदी त्या वेळी उपस्थित होते.
दानवे म्हणाले, की युतीचे चित्र शेवटच्या मिनिटापर्यंत निश्चित नसते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी युतीचा विचार न करता सर्व वॉर्डामध्ये निवडणूक लढविण्याची तयारी करावी. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीपेक्षा पुणे व िपपरी-चिंचवडची स्थिती अत्यंत चांगली आहे. दोन्ही महापालिका जिंकण्यास भाजपला चांगले वातावरण आहे. त्याचा कार्यकर्त्यांनी फायदा करून घ्यावा. पुणे शहर भाजप व आठ मंडलांतील कार्यकारिणी तसेच पक्षाचे सतरा मोर्चे आणि सतरा आघाडय़ांच्या नियुक्त्या ३० मे पूर्वी पूर्ण करण्याचे आदेशही दानवे यांनी दिले.
पुणे व िपपरी शहर भाजपमधील अंतर्गत वादाबाबत ते म्हणाले, की पक्षात नव्या कार्यकर्त्यांना पदे देताना जुन्यांकडून तक्रारी होतात. मात्र ज्यामध्ये झेप घेण्याची ताकद आहे, अशांनाच पदे द्यावीत. केवळ नावासाठी वाद घालण्याऐवजी पक्षासाठी काम करणाऱ्यांनाच यापुढे पक्षात स्थान मिळेल.