शिवसेनेसोबत युतीबाबत चर्चा करण्यासाठी आमची तयारी आहे. युती झाली तर ठीकच अन्यथा आम्ही एकट्याने लढू असे स्पष्ट करत जिल्हास्तरावरील नेत्यांनी युतीसाठी चर्चा करावी असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले. भाजपमध्ये गुंडाना प्रवेश दिला जात नाही असे सांगत त्यांना उमेदवारीही देणार नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
पुण्यात भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. शिवसेनेसोबत युती करण्यास आम्ही तयार आहोत. पण ही युती सन्मानपूर्वक व्हावी. तसे नसेल तर स्वबळावर निवडणुका लढवल्या जातील. निवडणुकीनंतर भाजपच क्रमांक एकचा पक्ष असेल असे आत्मविश्वासपूर्वकपणे त्यांनी सांगितले. जिल्हास्तरावरील नेत्यांना याबाबत सूचना केल्या आहेत. त्यांनी प्रदेश समितीच्या सल्ल्याने निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले.
दरम्यान, युतीसंदर्भात भाजपची भूमिका अनुकूल असताना शिवसेनेने यावर टीकाटिप्पणी  करून वातावरण गढूळ करू नये, असा सल्ला भाजपचे नेते व राज्याचे अर्थमंत्री व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना गुरूवारी दिला होता. शिवसेना आणि भाजपची युती व्हावी, यासाठी जिल्हास्तरावर निर्णय होत असल्यामुळे तसे प्रयत्न केले जात आहेत. मुंबईत युती व्हावी, ही भाजपची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले होते.
उल्लेखनीय म्हणजे शिवसनेने मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. गुरूवारी त्यांनी तशा सूचनाच पदाधिकाऱ्यांना गुरूवारी दिल्या. शिवसेना युतीसाठी कोणत्याही तडजोडी व आर्जवे भाजपला करणार नसून भाजपने सन्मानजनक प्रस्ताव दिला, तरच चर्चेची तयारी शिवसेनेने ठेवली आहे.