एकतर्फी प्रेमातून तरुणीचे मोटारीतून अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत एका १९ वर्षीय युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून शकील पठाण (वय २४), शहजाद अन्सारी (दोघेही रा. उरळी कांचन) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती ही मूळची उरळीकांचन येथील आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ती हडपसर परिसरात राहते. शकील याचे या तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. मात्र, त्याला तरुणीने नकार दिला होता. तेव्हापासून ती हडपसर परिसरात राहत होती. या ठिकाणचा पत्ता शोधून गुरुवारी सायंकाळी शकीलने युवतीला गाठले. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती भाव देत नसल्यामुळे तिला मित्रांच्या मदतीने मोटारीत घालून थेऊर येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन गेला. त्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर उरळीकांचन या ठिकाणी नेल्यानंतर त्या ठिकाणीही तिच्यावर अत्याचार केला. सकाळी त्यांनी सोडल्यानंतर मुलीने पोलिसांकडे जाऊन तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अंजुम बागवान हे अधिक तपास करीत आहेत. या आरोपींना २७ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.