भावाने मारले म्हणून घरातून निघून गेलेल्या एका गतिमंद तरुणीला पुणे स्थानकावरून फूस लावून पळवून नेल्यानंतर लोणावळा येथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. कोणतेही धागेदोरे नसताना संबंधित मुलीकडून मिळालेली माहिती व रेखाचित्राच्या माध्यमातून भोसरी पोलिसांनी ही कामगिरी केली.
विजयपाल मिक्की सिंग (वय २२, रा. खंडाळा, मूळ रा. राजस्थान), दिलावर हाफीज खान (वय २४, रा. लोणावळा), यासीन शकीर खान (वय ३५, बाजार पोस्ट ऑफिसजवळ, लोणावळा, दोघे मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने ३० एप्रिलला घर सोडले व ती बसने पुणे रेल्वे स्थानकावर आली. मुंबईला जाण्यासाठी स्थानकावर लोकांकडून ती पैसे मागत होती. या वेळी विजयपाल याने तिला पाहिले. तिला लग्नाचे आमिष दाखविले व बरोबर येण्यास भाग पाडले. त्याने या तरुणीला कार्ला येथे एका लॉजवर नेले. तेथे तिघांनी तिच्यावर बलात्कार केला.
विजयपाल याने पीडित तरुणीला आपण लग्न करू त्यासाठी घरून कपडे घेऊन ये, असे सांगून तिला कासारवाडी येथील नाशिक फाटा येथे सोडून दिले. दरम्यानच्या काळात तरुणीच्या कुटुंबातील व्यक्ती ती बेपत्ता झाल्याचे सांगण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते. त्याचवेळी ही तरुणी घरी परतली असल्याची माहिती मिळाली. गतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेतील मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने तरुणीकडे विचारपूस करण्यात आली. त्यात तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे उघडकीस आले. वैद्यकीय तपासणीमध्येही ही बाब स्पष्ट झाली. त्यानंतर पुणे- लोणावळा दरम्यान तपास करून पोलिसांनी आरोपींना पकडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले, सहायक पोलीस निरीक्षक रविकांत दरवडे, हवालदार तात्या तापकीर, किरण काटकर, महेश खांडे, लक्ष्मण नरवडे, राजेंद्र राठोड, योगिता गोडगे, मीर क्षीरसागर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
…अन् आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडले
पीडित तरुणी गतिमंद असल्याने या प्रकराचा छडा लावणे कठीण होते. मात्र, मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने तरुणीकडून माहिती घेण्यात आली. तरुणीनेही त्याला चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे तिच्याच मदतीने आरोपींचे रेखाचित्रे काढण्यासही पोलिसांना यश आले. हे रेखाचित्र सर्व ठिकाणी पाठवून चौकशी सुरू झाली. दरम्यानच्या काळात तरुणीला वेशांतर करून पुणे रेल्वे स्थानकावर नेण्यात आले. त्यातून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. तरुणीने त्याला ओळखले तो विजयपाल सिंग होता. त्याच्याकडून त्याच्या साथीदारांची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांनाही अटक केली. सामूहिक बलात्कारानंतर तरुणीच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढण्याचा विजयपाल याने प्रयत्न केला होता. मात्र, हे दागिने खोटे असल्याने या तरुणीने सांगितल्याने विजयपालचा प्रयत्न फसला.