अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेला व न्यायालयात शरण आलेला बडतर्फ न्यायाधीश नागराज सुदाम शिंदे (वय ३८, रा. कात्रज) याला विशेष न्यायालयाने पोलीस कोठडी नाकारली. या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे मुख्य जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी स्पष्ट केले.
शिंदे याच्या घरी कॅरम खेळण्यासाठी येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला दागिने व सदनिका देण्याचे आमिष दाखवून त्याने बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिंदे याच्या विरुद्ध ३१ जुलैला भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी शिंदे याने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेत अटक टाळण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्याला विशेष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.
न्यायालयाच्या आदेशनुसार शिंदे हा १० नोव्हेंबरला रुग्णवाहिकेतून  न्यायालयात हजर झाला. आपल्याला अपघात झाला असल्याने उपचारांची गरज असल्याचे त्याने न्यायालयाला सांगितले. त्यामुळे त्याला ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे डॉक्टरांना सहकार्य न केल्याने त्याला येरवडा कारागृहात पाठविले. त्यामुळे त्याने आपल्याला पुन्हा रुग्णालयात हलविण्याचा आदेश न्यायालयाकडून घेतला. त्यानंतर ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी अहवाल दिला व शिंदे याच्या पायाला फ्रॅक्चर नसून केवळ एक जखम असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर गुरुवारी शिंदे पायी चालत न्यायालयात आला.
आरोपीचे वकील हर्षद निंबाळकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा दाखला देत शिंदे याच्या पोलीस कोठडीला विरोध केला. अटक केल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसांतच पोलिसांना कोठडी मागता येते, असा युक्तिवाद निंबाळकर यांनी केला. विशेष न्यायाधीश मंगला धोटे यांनी तो मान्य केला.
दरम्यान, शिंदे याने त्याला अपघात झाल्याची खोटी कागदपत्रे सादर करून न्यायालयाची दिशाभूल केली. त्यासाठी त्याने अपघाताचाही बनाव केला. त्यामुळे विशेष न्यायालयाच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे उज्ज्वला पवार यांनी सांगितले.