लोणावळ्यातील कुमार रिसॉर्ट हॉटेलमध्ये १५ फेब्रुवारीला एका बालिकेवर बलात्कार व गळा चिरून तिचा निर्घृण खून केल्याच्या प्रकरणात हॉटेलातील दोन सुरक्षारक्षकांचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यातील एका आरोपीला लोणावळा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याला न्यायालयाने १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील दुसरा आरोपी फरार असून, त्याला शोधण्यासाठी चार पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक भास्कार थोरात यांनी दिली.
अजय शंकरराव दौदाड (वय ४२, मूळ रा. दत्तवाडी, जि. वर्धा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रायगड जिल्ह्य़ातील इंदापूर या गावात राहणारी एक सात वर्षीय मुलगी आपल्या वडिलांच्या सोबत लोणावळ्यातील कुमार रिसॉर्टमध्ये एका विवाहसोहळ्यासाठी आली होती. या मुलीचे १५ तारखेला रात्री नऊनंतर अपहरण झाले होते. १७ तारखेला दुपारी दीडच्या सुमारास या मुलीचा मृतदेह हॉटेलच्याच टेरेसवर आढळून आला होता. तिच्यावर बलात्कार करून तिचा गळा चिरण्यात आला होता. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी लोणावळ्यात मूक मोर्चा काढला होता. मोर्चाला हिंसक वळण लागल्याने नागरिकांनी हॉटेलची तोडफोडही केली होती.
हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने व घटनास्थळी कसलाही पुरावा न सापडल्याने पोलिसांना या घटनेचा तपासात अडचणी निर्माण झाल्या होत्या. तपासात हॉटेलच्या सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता, अजय दौदाड या सुरक्षारक्षकाला संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्या लाय डिटेक्टर व ब्रेन मॅिपग या दोन चाचण्या करण्यात आल्या. त्यात त्याने मूळ बिहारमधील असणाऱ्या संतोष राय एका साथीदाराच्या सोबतीने हा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याचा अहवाल शुक्रवारी पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. गुन्हा केल्यानंतर राय १७ तारखेलाच फरार झाला आहे. पोलिसांनी राय याच्या घरी जाऊन तपासणी केली, मात्र तो घरी सापडला नाही. त्यामुळे त्याच्या शोधासाठी चार पथके पाठविण्यात आली आहेत. तो लवकरच हाती लागेल, असे विश्वास भास्कर थोरात यांनी व्यक्त केला. दरम्यान, आरोपी राय यांच्या आईचे रक्ताचे नमुने पोलिसांनी घेतले असून, ते डीएनए चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत.