पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील एका खासगी शाळेच्या बसमधील विद्यार्थी सहायकाने चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडल्यानंतरही शाळेच्या प्रशासनाने संबंधिताविरुद्ध कोणतीही कारवाई न केल्याने संतप्त झालेल्या पालकांनी सोमवारी सकाळी शाळेच्या आवारात तोडफोड केली. काही पालकांनी या शाळेचे संचालक मारुती नवले यांनाही धक्काबुक्की केली. पालकांनी विद्यार्थी सहायक आणि बसचालक या दोघांना सोमवारी सकाळी मारहाण करून त्यांना पोलीसांच्या ताब्यात दिले. अमोल मारुती शेरकर असे विद्यार्थी सहायकाचे नाव असून, विनायक भिकाजी कारंजे असे बस चालकाचे नाव आहे. पोलीसांनी या दोघांनाही अटक केली आहे.
गेल्या शुक्रवारी या शाळेच्या बसमधील विद्यार्थी सहायकाने चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. संबंधित मुलींने घडलेला प्रकार घरी सांगितल्यावर पालकांनी तातडीने शाळेच्या संचालकांकडे याविरुद्ध तक्रार केली. त्यावेळी सहायकाविरुद्ध लगेचच कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले. मात्र, सोमवारी पुन्हा हाच सहायक बसमध्ये असल्याचे लक्षात आल्यावर पालकांचा राग अनावर झाला. यावेळी इतरही पाल्यांच्या पालकांनी शाळेच्या आवारात जमून संबंधित विद्यार्थी सहायक आणि त्या बसचा चालक यांना मारहाण केली. चिडलेल्या पालकांनी त्यानंतर शाळेच्या आवारात तोडफोड केली. पालकांनी मारुती नवले यांनाही यावेळी धक्काबुक्की केली. पोलीसांनी संतप्त पालकांना शांत राहण्याचे आवाहन करीत शाळेतील सुरक्षा तातडीने वाढविली. तातडीने कारवाई न केल्याने चिडलेले पालक पोलीसांचेही ऐकण्याच्या मनःस्थिती नव्हते. यावेळी पालकांनी नवले यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली.
दरम्यान, सध्या शाळेच्या आवारात तणावाचे वातावरण असून पोलीसांनी बंदोबस्त वाढवला आहे.