23 February 2020

News Flash

किलोमीटरसाठी ४० कोटी

महापालिका आणि पीएमपी यांच्या संयुक्त विद्यमाने तीस किलोमीटर लांबीचे मार्ग सध्या शहरात सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहेत.

तरीही मार्ग अपूर्णच; पांढरा हत्ती पोसण्याचा प्रकार

बीआरटीची  बिकट वाट :– पुणे : शहरातील पीएमपीची वाहतूक जलदगतीने व्हावी, यासाठी बीआरटी मार्ग बांधण्याचे निश्चित केल्यानंतर गेल्या तेरा वर्षांत महापालिकेला बीआरटी मार्गाचे सक्षम जाळे विकसित करण्यात पूर्णपणे अपयश आले आहे. एका बाजूला ही वस्तुस्थिती असताना एक किलोमीटर लांबीचा बीआरटी मार्ग विकसित करण्यासाठी तसेच त्याची देखभाल दुरुस्ती आणि सध्या त्याची केली जात असलेली पुनर्रचना मिळून प्रती किलोमीटर चाळीस कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. एवढा खर्च करूनही बीआरटी कागदावरच राहिली आहे.

जलदगती, उच्च प्रतीची आणि प्रवासी केंद्रित सार्वजनिक वाहतूक सेवा देण्यासाठी बीआरटी मार्ग बांधण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी केंद्राकडून हजारो कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध झाला. या निधीव्यतिरिक्त बीआरटी मार्गासाठी गाडय़ा खरेदीचा हिस्सा, मार्गाची पुनर्रचना, मार्गाची देखभाल दुरुस्ती, लेखापरीक्षण, सिग्नल यंत्रणा, स्थानकांची उभारणी अशा एका कामांसाठी कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. अद्यापही यातील काही कामे तेरा वर्षांनंतरही सुरूच असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे बीआरटी मार्ग हा पांढरा हत्ती पोसण्याचा प्रकार ठरत आहे.

महापालिका आणि पीएमपी यांच्या संयुक्त विद्यमाने तीस किलोमीटर लांबीचे मार्ग सध्या शहरात सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहेत. त्यासाठी एक हजार दोनशे कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.  मात्र हे तीस किलोमीटर लांबीचे मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत, हे वास्तव आहे. काही टप्प्यात, ते सुरू आहेत. तीस किलोमीटर लांबीपैकी केवळ दहा ते बारा किलोमीटर लांबीच्याच मार्गावर बीआरटी सेवा सुरू आहे. एक किलोमीटर लांबीच्या मार्गावर तब्बल चाळीस कोटी रुपयांचा खर्च आतापर्यंत झाला आहे. त्यानंतरही या सेवेचे सक्षमीकरण होऊ शकलेले नाही. बीआरटी मार्गासांठी गाडय़ा खरेदी, मार्गाचे सुशोभीकरण, स्थानकांची उभारणी, भुयारी मार्ग, पादचारी मार्ग, प्रवाशांना पायाभूत सुविधा, आयटीएमएस यंत्रणा, मार्गाची पुनर्रचना यावर हा कोटय़वधी रुपयांचा खर्च झाला आहे. गाडय़ांसाठी तत्कालीन जवाहरलाल नेहरू नागरी राष्ट्रीय पुनरूत्थान योजनेअंतर्गत निधी प्राप्त झाला होता. त्यानंतर महापालिकेला स्वत:च्या हिश्श्याची रक्कम द्यावी लागली. या निधीतून बीआरटीसाठी गाडय़ा खरेदी करण्यात आल्या. सध्या या गाडय़ांचीही दुरवस्था आहे. बीआरटी मार्गाचा महत्त्वाचा घटक असलेली बहुतांश गाडय़ातील आयटीएमएस यंत्रणा बंद आहे. स्वयंचलित पद्धतीने दरवाजे उघडण्यातही अडथळे येत असल्याच्या तक्रारी आहेत.

कामे अपूर्णच

बीआरटी मार्गाच्या मूळ रचनेनुसार रस्त्याच्या मध्यभागी बीआरटी मार्ग घेण्यात आला होता. हा मार्ग केवळ बीआरटी गाडय़ांसाठीच राखीव होता. मार्गाच्या मूळ आखणीनुसार मध्यभागी मार्ग असला तरी त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याची उपरती प्रशासनाला झाली आणि या मार्गाची पुनर्रचना करण्यास सुरुवात झाली. सध्या पुनर्रचनेची कामे स्वारगेट-कात्रज या मार्गावर सुरू आहेत. त्यासाठी महापालिकेने कोटय़वधी रुपये मंजूर केले आहेत. हडपसर रस्ता बीआरटी मार्गाची पुनर्रचनाही प्रस्तावित आहे. त्यामुळे हा मार्गही नीट सुरू नाही, तसेच हडपसर बीआरटी मार्गातील अडथळे दूर करण्यात येत आहेत. त्यामुळे स्वारगेट-हडपसर हा मार्गही पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याचे चित्र आहे. नगर रस्ता बीआरटी मार्गावर मेट्रोची कामे सुरू आहेत. त्यामुळे तो टप्प्याटप्प्याने सुरू आहे.

अनेक गोष्टींचा अभाव

राखीव बस मार्गिका, समपातळीवर बसथांबे, रुंद दरवाजे, बंदिस्त बसस्थानके, विशिष्ट प्रकारच्या भरपूर गाडय़ा, प्रवासी माहिती प्रणाली, वाहन ट्रॅकिंग सिस्टिम, स्वयंचलीत प्रणाली, प्रवाशांना सोयीसाठी ट्रान्सफर स्टेशन, टर्मिनल आणि डेपो या सुविधांवर खर्च करण्यात आला आहे. त्यापैकी काही ठिकाणी सुविधा सुरू आहेत. तर काही ठिकाणी सुविधा बंद आहेत.

First Published on February 13, 2020 12:58 am

Web Title: rapid transport of pmps to the city brt route akp 94
Next Stories
1 रहिवासी क्षेत्रानुसार टीडीआर, एफएसआयची मागणी
2 गुलाब बाजार बहरला!
3 एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक
Just Now!
X