भारताचा त्र्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन गुरुवारी देशभर उत्साहात साजरा होत असताना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचा खजिना नव्याने समृद्ध झाला आहे. १९४५ मध्ये झालेल्या ऐतिहासिक सिमला परिषदेचे दुर्मीळ चित्रीकरण राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला प्राप्त झाले असून या ठेव्यात महात्मा गांधी, मौलाना आझाद, सी. राजगोपालाचारी असे दिग्गज पाहायला मिळणार आहेत.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी याबाबत माहिती दिली. रॉयल इंडियन नेव्हीचे तत्कालीन अधिकारी विल्यम टेलर यांनी आठ एमएम प्रकारात बारा मिनिटांची ही ध्वनिचित्रफीत चित्रित केली होती. युनायटेड किंग्डम येथे स्थायिक असलेल्या विल्यम टेलर यांच्या कन्या मार्गारेट साउथ यांनी हे चित्रीकरण राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे जतन करण्यासाठी पाठवले आहे.

प्रकाश मगदूम म्हणाले, विल्यम टेलर यांनी केलेल्या चित्रीकरणात महात्मा गांधी, मौलाना आझाद, सी. राजगोपालाचारी, बॅरिस्टर महंमद अली जिना, डॉ. राजेंद्र प्रसाद, भुलाभाई देसाई, मास्टर तारा सिंह, जी. बी. पंत असे अनेक दिग्गज पाहायला मिळतात. लॉर्ड व्ॉव्हेल आणि म. गांधी परिषदेआधी भेटून परिषदेच्या ठिकाणी चालत जाताना या चित्रीकरणात दिसतात. पंचवीस जून ते चौदा जुलै १९४५ या दरम्यान पार पडलेल्या सिमला परिषदेतील हा अमूल्य ठेवा आहे.

हे चित्रीकरण करणारे विल्यम टेलर यांचे २०१० मध्ये निधन झाले. त्यांच्या कन्या मार्गारेट साउथ राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला लिहिलेल्या पत्रात म्हणतात, सिमला हे माझ्या वडिलांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे ठिकाण होते. वयाच्या सतराव्या वर्षी ते ब्रिटिश इंडिया स्टीम नेव्हिगेटर कंपनीत रुजू झाले. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते रॉय इंडियन नेव्हीमध्ये दाखल झाले. तेथे लेफ्टनंट या हुद्दय़ावर ते कार्यरत होते. सैन्यातून निवृत्त होऊन मायदेशी परतण्याआधी ते सिमला येथे सुट्टीसाठी गेल्याची नोंद आहे. कॅमेरा ही त्यांची विशेष आवड होती. त्या काळात त्यांनी सिमला परिषदेचे केलेले चित्रीकरण महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना आणि व्यक्ती यांचे दर्शन घडवते.