साडेचारशे वर्षांपूर्वीची ‘तारीफ-ई-हुसेनशाही’ या हस्तलिखिताची जगातील एकमेव प्रत भारत इतिहास संशोधक मंडळाकडे आहे. अमूल्य असा हा प्राचीन ठेवा जतन करणे हेच संस्थेचे उद्दिष्ट आणि काम आहे. त्यामुळे हा ठेवा देशाबाहेर जाता कामा नये, अशी भूमिका इतिहास संशोधक म. श्री. माटे यांनी शनिवारी मांडली.
न्यूयॉर्क येथील मेट्रोपॉलिटन म्युझियम येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठेवण्यासाठी अमेरिकेला रवाना होत आहे. ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे आणि राष्ट्रीय संपत्ती असलेले हे हस्तलिखित देशाबाहेर पाठविणे धोक्याचे ठरेल, असा आक्षेप घेत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि निनाद बेडेकर यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या या कृतीला आक्षेप घेतला आहे. मंडळाचे माजी सचिव म. श्री. माटे यांनी हीच भूमिका घेत त्यांच्या सुरात सूर मिसळला आहे.
जगामध्ये या हस्तलिखिताची एकमेव प्रत आहे. त्यामुळे अनमोल अशा या हस्तलिखिताचे मूल्यांकन करणे अवघड आहे. त्याचा विमा उतरविला असल्याचे मंडळाचे सचिव प्रा. श्री. मा. भावे यांनी सांगितले आहे. मात्र, कितीही कोटी रुपयांचा विमा उतरविला असला, तरी त्या हस्तलिखिताची चोरी झाल्यावर ती वस्तू थोडीच परत मिळणार आहे. १५६५ ते १५७५ या कालावधीत लिहिलेले हे हस्तलिखित फार्सी भाषेमध्ये आहे. १९३० च्या सुमारास ते मंडळाकडे मोठय़ा विश्वासाने सुपूर्द करण्यात आले होते. आता ते परदेशी पाठवून परत मंडळाकडे येईलच याची शाश्वती देणे अशक्य आहे, याकडेही माटे यांनी लक्ष वेधले.