25 January 2021

News Flash

पाच नद्यांच्या माहात्म्याची दुर्मीळ हस्तलिखिते उपलब्ध

स्कंद नारद संवादे अशी सुरुवात असलेल्या कृष्णा माहात्म्याचे ६० अध्याय आहेत.

भीमा माहात्म्यातील चित्र

विद्याधर कुलकर्णी, लोकसत्ता

पुणे : भीमा, कृष्णा, गोदावरी, तापी आणि पयोष्णी या पाच नद्यांचे माहात्म्य कथन करणारी दुर्मीळ हस्तलिखिते मराठी हस्तलिखित केंद्राकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. या पाच नद्यांच्या १३ माहात्म्यांचा यामध्ये समावेश आहे. या माहात्म्यांच्या आधारे अमेरिकेच्या अरिझोना विद्यापीठातील डॉ. अ‍ॅन फेल्डहाऊस यांनी संशोधन ग्रंथाचे लेखन केले असून डॉ. विजया देव यांनी ‘नदीचे स्त्रीत्व’ हे त्याचे मराठी रूपांतर केले आहे.

या हस्तलिखितांपैकी कृष्णा माहात्म्य हे स्कंद पुराणातील मूळ संस्कृत तर, भीमा माहात्म्य हे पद्म पुराणातील मराठी ओवीबद्ध माहात्म्य आहे. स्कंद नारद संवादे अशी सुरुवात असलेल्या कृष्णा माहात्म्याचे ६० अध्याय आहेत. मूळ संस्कृत हस्तलिखित सखाराम विठ्ठल चाफळकर यांनी शके १८०७ मधील कार्तिक शुद्ध द्वादशी या तिथीला वाई येथील विराज वैभव छापखान्यामध्ये छापून घेतले आहे. कृष्णा माहात्म्याची किंमत दीड रुपये होती, अशी माहिती दुर्मीळ हस्तलिखितांचे अभ्यासक वा. ल. मंजूळ यांनी दिली.

भीमा माहात्म्य सचित्र असून त्यावर काळाचा उल्लेख नाही. ब्रह्मदेव आणि नारद संवादातून भीमा माहात्म्य निर्माण झाले आहे. भीमाशंकर डोंगरावर शंकराने त्रिपुरासूराचा वध केला. त्यावेळी अंगातून निघालेल्या घामाने भीमा नदी जन्माला आली, अशी आख्यायिका सांगितली जाते. रघुवंशातील भीमरथ राजाने या नदीमध्ये स्नान करून मोक्ष मिळविला. त्यामुळे भीमा नदी भीमरथी झाली. पुढे इंद्रायणी, मुळा-मुठा संगम, नीरा नरसिंहपूर, कृष्णा, माण अशा नद्यांना भेटत कृष्णेच्या रूपाने समुद्राला मिळाली. पंढरपूर येथे या नदीला पुष्पावती आणि कुंडल तीर्थ मिळतात, असे भीमा माहात्म्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. या माहात्म्यातील ३५ व्या अध्यायात ‘वि म्हणजे विज्ञान ठ म्हणजे अज्ञान आणि ल म्हणजे दूर करी म्हणोनि विठ्ठल माझे नाव’ असे म्हटले आहे, याकडे मंजूळ यांनी लक्ष वेधले.

या माहात्म्यांच्या आधारे डॉ. अ‍ॅन फेल्डहाऊस यांनी संशोधन ग्रंथाचे लेखन केले आहे. त्याचा डॉ. विजया देव यांनी ‘नदीचे स्त्रीत्व’ हा मराठी अनुवाद केला आहे.

डॉ. देव यांनी पाच नद्यांची माहात्म्ये कथन करणारी १३ दुर्मीळ हस्तलिखिते मराठी हस्तलिखित केंद्राकडे नुकतीच सुपूर्द केली आहेत, असे मंजूळ यांनी सांगितले.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 2:47 am

Web Title: rare manuscripts of mahatma of five rivers available zws 70
Next Stories
1 पुरंदर विमानतळाचा दूरवर तळ
2 ‘स्वच्छ’चे काम काढून घेण्याचा डाव ‘सफल’
3 मिळकतकरामध्ये ११ टक्के वाढीचा प्रस्ताव
Just Now!
X