मावळ लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा कल पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी घेतला, तेव्हा सर्वानीच चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नावाची शिफारस केली.
मुंबईत ‘देवगिरी’त राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली, त्यात पवार यांनी राज्यातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे, प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते. या वेळी मावळच्या उमेदवारीबाबत मतदारसंघातील स्थानिक नेत्यांचा कल घेण्यात आला. आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, माजी मंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे, राष्ट्रवादीचे पिंपरी शहराध्यक्ष योगेश बहल, माजी महापौर नानासाहेब शितोळे, बबनराव भेगडे आदींनी आपली मते मांडली. बहुतांश नेत्यांनी जगतापांच्या नावाची जोरदार शिफारस केली. याबाबतची अधिकृत घोषणा मात्र करण्यात आली नाही. मावळचे गेल्या निवडणुकीचे उमेदवार व जगतापांचे पक्षांतर्गत विरोधक मानले जाणारे आझम पानसरे बैठकीस अनुपस्थित होते.
मावळसाठी तीव्र इच्छुक माजी महापौर संजोग वाघेरे यांनी उमेदवारीसाठी जोरदार युक्तिवाद करत स्वत:ची बाजू मांडली. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा विषय मार्गी न लागल्यास निवडणूक न लढवण्याची भूमिका लक्ष्मण जगताप यांनी पक्षनेतृत्वाकडे यापूर्वीच स्पष्ट केली आहे. तर, निर्णय होवो अथवा न होवो, पक्षाने उमेदवारी दिल्यास वाघेरे यांनी लढण्याची तयारी दाखवली आहे. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या नावाचा विचार करण्याची मागणी पक्षाकडे केली आहे.