News Flash

यंदा सरासरीइतका पाऊस!

करोनाच्या कहरात हवामान विभागाकडून मोसमी पावसाचे भाकित

(संग्रहित छायाचित्र)

करोना विषाणूच्या संसर्गाचा कहर सुरू असतानाच यंदाच्या मोसमी पावसाबाबत सर्वच नागरिकांना आणि प्रामुख्याने बळिराजाला सुखावणारी सुवार्ता आली आहे. भारतीय हवामान विभागाने मोसमी पावसाबाबत बुधवारी (१५ एप्रिल) दिलेल्या दीर्घ अंदाजानुसार यंदाही जून ते सप्टेंबर या मोसमाच्या कालावधीत पाऊस सरासरी इतका पडणार आहे.

नैर्ऋत्य मोसमी पावसाबाबत हवामान विभागाने दिलेल्या पहिल्या अंदाजानुसार यंदा ५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत ९६ ते १०४ टक्क्य़ांपर्यंत पाऊस पडेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पावसाचे हे प्रमाण सरासरी इतकेच असणार आहे. गतवर्षीही पहिला अंदाज अशाच पद्धतीचा देण्यात आला होता. दिलेल्या अंदाजापेक्षा पाच टक्के अधिक किंवा कमी प्रमाणातही पाऊस पडू शकतो, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

मोसमी पावसावर परिणाम करणाऱ्या ‘एल निनो’चे सावट यंदाही राहणार आहे. मात्र, तो कमजोर राहणार असून, मोसमाच्या उत्तरार्धात तो असेल. परिणामी पावसावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. मोसमी पावसाचा

दुसरा अंदाज अधिक अचूक असेल. हा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात किंवा जूनच्या सुरुवातीला देण्यात येईल.

यंदाही विलंब

गेल्या वर्षी मोसमी पावसाच्या प्रगतीला समुद्रात निर्माण झालेल्या विविध चक्रीवादळांचा मोठा अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे केरळमध्ये सुमारे आठवडय़ाच्या आणि राज्यामध्ये १२ ते १४ दिवसांच्या विलंबाने मोसमी पाऊस पोहोचला होता. यंदाही त्याला काहीसा विलंब होईल. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओदिशा, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आदी भागांमध्ये मोसमी पावसाचा प्रवास ३ ते ७ दिवस विलंबाने होईल. मुंबई, कोलकाता या शहरांत ११ जूनपर्यंत, तर चेन्नईमध्ये ४ जूनपर्यंत मोसमी पाऊस दाखल होऊ शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 1:03 am

Web Title: ravages of corona seasonal rain forecasts from the meteorological department abn 97
Next Stories
1 ‘भारत पढे ऑनलाइन’ मोहिमेसाठी सूचना पाठवण्याचे आवाहन
2 अत्यावश्यक सेवेचा गैरवापर
3 डॉक्टरांवर विश्वास ठेवा, यंत्रणेला सहकार्य करा!
Just Now!
X